मोहम्मद शमी, सूर्या २ कसोटींना मुकणार?
(sports news) BCCI ने अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी १६ सदस्यीय संघ जाहीर केला. रोहित शर्मा व विराट कोहली हे १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० संघात परतले आणि हिटमॅन पुन्हा नेतृत्व करणार असल्याने चाहते सुखावले. या मालिकेत लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली गेली आहे, तर मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या हे अद्याप पूर्णपणे बरे झाले नसल्याने खेळणार नाहीत. वन डे वर्ल्ड कप गाजवणारा शमी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींनाही मुकणार असल्याचे वृत्त आता समोर येत आहे.
२५ जानेवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यातल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पण, शमी अद्यापही दुखापतीतून सावरलेला नाही आणि तो पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नाही. ट्वेंटी-२० क्रमवारीतील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव याचेही पुनरागमन लांबणीवर पडले आहे. त्याला हर्निया शस्त्रक्रिया करावी लागमार असल्याने तो आयपीएल २०२४च्या सुरुवातीच्याही काही सामन्यांना मुकण्याचे संकेत मिळत आहेत.
”शमीने अद्याप गोलंदाजीला सुरुवात केलेली नाही. तो लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल आणि तंदुरुस्ती सिद्ध करेल. पण, सध्यातरी तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींत खेळण्याची शक्यता कमीच आहे. सूर्यकुमार यादवलाही अधिक वेळ लागू शकतो. हर्निया शस्त्रक्रियेनंतर त्याला ८-९ आठवडे लागतील. तो आयपीएलसाठी तो तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे, ” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. (sports news)
मोहम्मद शमीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी संघात निवड केली गेली होती, परंतु ३३ वर्षीय गोलंदाजाने तंदुरुस्तीच्या कारणास्तव मालिकेतून माघार घेतली. त्याचा मालिकेतील समावेश हा तंदुरुस्तीवर अवलंबून असेल असे बीसीसीआयने सांगितले होते आणि BCCI च्या वैद्यकिय टीमने त्याला तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले नाही. शमीला मैदानावर उतरवण्याची घाई बीसीसीआयला करायची नाही. त्यांच्याकडे कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज हे दोन सक्षम पर्याय आहेत. शिवाय घरच्या मैदानावर ही मालिका होणार असल्याने फिरकीपटूंवर अधिक भीस्त असेल.