कोहलीच्या जागी टीम इंडियामध्ये अखेर ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
(sports news) इंग्लंडची टीम सध्या भारताच्या दौऱ्यावर आली आहे. या ठिकाणी इंग्लंड टीम इंडियासोबत 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळणार आहे. मात्र या सिरीजपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली या सिरीजमधील पहिले 2 सामने खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. यानंतर आता विराट कोहलीची जागा कोण घेणार हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. मात्र अखेर विराटची रिप्लेसमेंट मिळाली आहे. इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या 2 टेस्टसाठी विराटच्या जागी रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे.
इंग्लंड विरूद्ध पहिला टेस्ट सामना 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सिरीजपूर्वी विराटने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता त्याच्या जागी रजत पाटीदारचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. रजत पाटीदारने नुकतंच भारत अ टीमकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन शतकं झळकावली आहेत. त्याने 5 दिवसांत दोन शतके झळकावून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
रजत पाटीदारला मिळाली संधी
विराट खेळणार नसल्याने त्याच्या जागी टीममध्ये कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. पहिल्या दोन टेस्ट सामन्यांसाठी 30 वर्षीय फलंदाज रजत पाटीदारचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलाय. त्याचा अलीकडचा फॉर्म पाहिला तर त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध 151 रन केले होते. याच्या 4 दिवसांपूर्वी त्याने याच टीमविरुद्ध सराव सामन्यात 111 रनची इनिंग खेळली होती. (sports news)
विराट कोहली 2 टेस्ट सामने खेळणार नाही
2 दिवसांपूर्वी विराट इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली होती. विराट कोहलीने खासगी कारणास्तव सुट्टी घेतल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. विराटने बोर्डाकडे सुट्टीची विनंती केल्यानंतर त्याची विनंती मान्य करण्यात आली. विराट कोहलीने रोहित शर्मा, टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्टर्सशी बोलणं केलं आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणं हे नेहमीच त्याचे सर्वोच्च प्राधान्य असतं, काही वैयक्तिक परिस्थितीमुळे काही निर्णय घ्यावे लागतात, असं बीसीसीयआने म्हटलं आहे.
रहाणे-पुजाराला संधी नाहीच
कोहलीने दोन टेस्ट सामन्यांमधून माघार घेतल्यानंतर अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारा यांना संधी मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र अखेरीस त्यांना डावलून पाटीदारला संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये पुजारा अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. मोसमातील पहिल्याच सामन्यात त्याने द्विशतक झळकावलं होतं.