इचलकरंजी यंत्रमागधारकांत चिंतेचे वातावरण
यंत्रमाग उद्योगात (loom industry) आधीच मंदीचे सावट आहे, त्यातच कापडाला मागणी नसून दरही अपेक्षित मिळत नाही. उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कापडाची व्यापार्यांकडून मागणी होत असल्यामुळे यंत्रमागधारकांसमोर, विशेषत: साध्या यंत्रमागधारकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गत आठवड्यातील शुक्रवारपासून कापड दरात कपात होत असल्यामुळे यंत्रमागधारक हवालदिल झाले असून चिंतेचे वातावरण आहे.
इचलकरंजी शहरातील अर्थकारण वस्त्रोद्योगाशी निगडित आहे. दिवाळीनंतर वस्त्रोद्योगाच्या चक्रातील यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था येईल, अशी अपेक्षा होती; मात्र कापडाला मागणीच नसल्याने यंत्रमागधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आधीच उत्पादन खर्च व कापड विक्री यातील ताळमेळ घालताना नाकी नऊ येत आहेत. त्यातच व्यापार्यांकडून मंदीचे कारण पुढे करत कापड कमी दराने घेण्यात येत आहे.
तसेच काही व्यापार्यांकडून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची आधीच मजुरी कमी असताना पुन्हा अर्धा ते पाऊण पैसे मजुरी कपात करून कापड घेण्यात येत आहे. त्यामुळे यंत्रमागधारक भरडले जात आहेत. शासनाने वस्त्रोद्योगाला (loom industry) बूस्टर न दिल्यास आणखी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे.