शिवसेनेचा ‘कोहिनूर’ हरपला
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (political leader) यांचे शुक्रवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनोहर जोशी यांना याआधी म्हणजेच २४ मे २०२३ रोजी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता परत एकदा त्यांना रूग्णलयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी तीन वाजता हृदयविकार झटका आल्याने त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल केले होते अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
त्यांचे (Manohar Joshi) पार्थिव सकाळी ११ ते २ या वेळेत माटुंगा पश्चिम येथील रुपारेल कॉलेज येथील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले मनोहर जोशी (political leader) हे बाळासाहेबांचे निकटवर्तीय मानले जातात. पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या मनोहर जोशी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिक्षक म्हणून नोकरीने केली. १९६७ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९७६ ते १९७७ या काळात त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. २००२ ते २००४ पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते. मात्र, वृद्धापकाळामुळे ते काही काळ राजकारणात सक्रिय नव्हते.
जावयाच्या मित्राला जमीन दिल्याने द्यावा लागला राजीनामा
मुख्यमंत्री या नात्याने जोशी यांनी पुण्यातील एका शाळेसाठी राखीव असलेल्या जमिनीचा काही भाग जावई गिरीश व्यास यांच्याशी संबंधित बिल्डरला दिला होता. व्यास यांनी १९९८ मध्ये त्या जमिनीवर सुंद्यू हाऊसिंग कॉम्प्लेक्स बांधले. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांच्यामुळे जोशी यांना जानेवारी १९९९ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. मार्च २००९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गृहसंकुल बेकायदेशीर घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने २००११ मध्ये हा निर्णय कायम ठेवत जोशी यांना १५ हजार रुपयांचा दंड केला होता.