भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून कुठे आणि कधी पाहाल?

विश्रांती देण्यात आलेला प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीची चिंता असली, तरी कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यात सक्षम असलेल्या भारतीय संघाचे आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला नमवत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य असेल. भारताला हा सामना जिंकून मायदेशातील वर्चस्व अधोरेखित करताना सलग १७वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यातच रांची येथील खेळपट्टी फिरकीच्या पक्षात असण्याची शक्यता असल्याने भारताचे पारडे अधिकच जड मानले जात आहे.

पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने खेळ उंचावताना सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत सध्या २-१ असा आघाडीवर आहे. प्रमुख फलंदाजांची माघार, दुखापती आणि निराशाजनक कामगिरी यामुळे भारताला नवोदित फलंदाजांवर अवलंबून राहावे लागले आहे. या फलंदाजांनी संधीचे सोने करताना भारताच्या विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच भारतासाठी बुमराची कामगिरीही निर्णायक ठरली आहे. परंतु दुखापतींचा धोका लक्षात घेता भारताने रांची कसोटीसाठी त्याला विश्रांती दिली आहे.

भारताने दशकभरापासून मायदेशात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०१२मध्ये ॲलिस्टर कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने भारताला भारतात नमवण्याची किमया साधली होती. मात्र, त्यानंतर भारताने मायदेशात सलग १६ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. शिवाय भारताला ४७ पैकी ३८ कसोटी सामने जिंकण्यात यश आले आहे. आता ही घोडदौड कायम राखण्यासाठी भारताचा संघ उत्सुक आहे.

जडेजा, अश्विनवर भिस्त

रांची येथील खेळपट्टीला पहिल्या दिवसापासूनच भेगा पडण्यास सुरुवात होईल असे चित्र आहे. अशात डावखुरा रवींद्र जडेजा आणि ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन या अनुभवी फिरकीपटूंची भूमिका भारतासाठी निर्णायक ठरेल. गेल्या सामन्यात राजकोट येथे आपल्या घरच्या मैदानावर जडेजाने अष्टपैलू चमक दाखवली होती. त्याने पहिल्या डावात शतक साकारतानाच, दोन डावांत मिळून सात गडी बाद केले होते. याच सामन्यात अश्विनने कसोटी कारकीर्दीतील ५०० बळींचा टप्पा गाठला होता. फलंदाजीत भारताची भिस्त कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि सर्फराज खानवर असेल. तसेच बुमराच्या जागी कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न भारतीय संघासमोर आहे. भारताकडे मुकेश कुमार आणि आकाश दीप यांचा पर्याय आहे. आकाशला संधी मिळाल्यास तो कसोटी पदार्पण करेल.

संघ

● भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद

● इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टिरक्षक), टॉम हार्टली, जेम्स अँडरसन, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर.

● वेळ : सकाळी ९.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८, जिओ सिनेमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *