दात घासण्याआधी तुम्हीदेखील टुथब्रश ओला करताय?
उत्तम मौखिक आरोग्यासाठी (oral health) दातांची स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे. रोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी दात घासणे खूप गरजेचे आहे. यामुळं दातात अडकलेले अन्नाचे कण निघून जातात. अनेक जण दात घासताना काही चुका करतात त्याचा परिणाम मौखिक आरोग्यावर होतो. दात किडणे, दात पडणे अशा समस्या निर्माण होतात. दात किडल्यानंतर एकतर तो काढून टाकावा लागतो किंवा मग रूट कॅनल करावे लागते. रूट कॅनलचा खर्च खूप जास्त येतो. या खर्च टाळण्यासाठी काही गोष्टी आत्ताच जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
दात घासणे याचा आरोग्याशी थेट संबंध आहे. दातावर जमा होणारे अन्नाचे कण आणि प्लाकचा थर नुसत्या बोटाने घासून निघत नाही. त्यामुळं ब्रश करणे खूप गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दातांना 2-3 मिनिटांपर्यंत ब्रश करणे गरेजेचे आहे. त्याचबरोबर रोज ब्रश करताना तुम्ही एक चुक करता.
टुथब्रश ओला करावा का?
ब्रशवर टुथपेस्ट लावण्याआधी अनेकजण टूथब्रश ओला करतात पण तुम्ही ही चूक करत असाल तर आत्ताच थांबा. कारण या चुकीमुळं तुमचे मौखिक आरोग्य (oral health) बिघडते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही टुथब्रश ओला केल्यानंतर त्याच्यावर टुथपेस्ट लावता. यामुळं लवकर फेस निर्माण होतो आणि टुथपेस्ट लवकर तोंडातून बाहेर येते. तसंच, जोरात ब्रश केल्याने मौखिक आरोग्यदेखील बिघडू शकते.
धुळ लागल्यास काय करावं?
ब्रश ओला न करता त्याला लागलेली धुळ साफ कशी करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण त्यावरही तज्ज्ञांनी उपाय सुचवला आहे. टुथब्रशला धुळ लागू नये यासाठी दात घासून झाल्यानंतर टुथब्रशला कॅप लावून ठेवा.
ब्रश कितीवेळा करावा?
उत्तम मौखिक आरोग्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करावा. तसंच, दात घासताना ब्रश हातात धरताना त्याचे ब्रिस्टल हिरड्यांसोबत 45 डिग्रीच्या कोनात राहतील याची काळजी घ्या. तर मागे असलेल्या दातांसाठी ब्रश गोल फिरवावा. ब्रश करताना दातांचा आतील भागही स्वच्छ करा.
टुथपेस्टची निवड कशी कराल?
टूथपेस्टची निवड करताना शक्यतो सफेद व फ्लोराईडयुक्त असावी जेणेकरुन दातांना कीड लागण्याची शक्यता कमी होते. सहा वर्षांखालील मुलांसाठी फ्लोराइडयुक्त टुथपेस्ट टाळावी. दात घासताना जीभेची स्वच्छतादेखील आवश्यक आहे. टूथब्रशच्या मागे असलेल्या खडबडीत भागाने किंवा बोटाने जीभ घासत जा.