लोकसभा निवडणुकीत मोदींना दुसरा धक्का
लोकसभा निवडणुकीसाठी (election) भाजपची पहिली यादी जाहीर होताच, तिकिटे मिळालेल्या उमेदवारांची गळती सोमवारीही सुरू राहिली. पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून मिळालेले तिकीट नाकारणारे पवन सिंह यांच्या पाठोपाठ, उत्तर प्रदेशातील बाराबंकीचे खासदार उपेंद्रसिंह रावत यांनीही अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोमवारी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
‘माझा डीपफेक व्हिडीओ तयार केला असून याची चौकशी व्हावी, अशी विनंती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केली आहे. निर्दोष सिद्ध होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही,’ अशी घोषणा खासदार रावत यांनी केली.
भाजपच्या यादीतील चार भोजपुरी गायक-अभिनेत्यांपैकी पवन सिंह यांनी सोमवारी नड्डा यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पवन सिंह यांनी तिकीट मिळाल्यानंतर काही तासांतच लोकसभा निवडणूक (election) लढवण्यास असमर्थता व्यक्त केली. यानंतर नड्डा यांनी पवन सिंह यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले. या भेटीवेळी बिहार भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे विद्यमान प्रभारी मंगल पांडे हेही उपस्थित होते. तिकीट का नाकारले, या प्रश्नाला पवन सिंह यांनी उत्तर दिले नाही.
वादग्रस्त आयुष्य
पवन सिंह यांची भोजपुरी गाणी व चित्रपटांइतकेच त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही कमालीचे वादग्रस्त आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती व दुसऱ्या पत्नीने त्यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला. अन्य काही महिलांनीही त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, पवन सिंह यांची उमेदवारी शनिवारी जाहीर होताच, भोजपुरी चित्रपटांतील त्यांच्या वादग्रस्त चित्रफिती समाजमाध्यमावर फिरू लागल्याने पक्षनेतृत्वाने त्यांचे तिकीट कापण्याचे तातडीने ठरवले. याचा निर्णयही तुम्हीच जाहीर करा, असा आदेश त्यांना देण्यात आला. मात्र, तिकीट नाकारण्याचा निर्णय पक्षाचा नव्हे, तर पवन सिंह यांचाच होता, असे सांगताना, त्यांना मतदारसंघ बदलून हवा असल्याच्या चर्चेवर पक्षातील सूत्रांनी मौन बाळगले.
आसनसोलमधून दोनदा लोकसभेवर निवडून आलेले गायक बाबूल सुप्रियो यांनी याआधी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते व पवन सिंह यांचा छत्तीसचा आकडा असल्याचे सांगितले जाते. तेथून शत्रुघ्न सिन्हा निवडून आले.