दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे गुण

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या याआधीच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमधीलच ही एक विशेष तरतूद असणार आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रवीष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना २०२१-२२ या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्याचा निर्णय वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जाहीर केला आहे, तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववी व दहावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन क्रीडा गुण देण्यात येणार आहेत.

असे दिले जातात गुण

जिल्हास्तरीय क्रीडा सहभाग १०

राज्यस्तरीय क्रीडा सहभाग १५

राष्ट्रीय क्रीडा सहभाग २०

आंतरराष्ट्रीय क्रीडा सहभाग २५

इंटरमिजिएटच्या आधारावर गुण

– कोविड १९ मुळे २०२१-२२ यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी एलिमेंटरी परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेत प्राप्त श्रेणीच्या आधारावर या वर्षापुरते सवलतीचे कलागुण देण्यात येणार आहेत.

– हा निर्णय दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांना कलागुणांचा लाभ यामुळे मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *