महागाचा भडका उडालेला असताना सर्वसामान्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी
महागाचा भडका उडालेला असताना सर्वसामान्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. महागाईत आता डोकेदुखी सुद्धा तुम्हाला परवडणार नाही. 1 एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांचे (medicine) दाम वाढणार आहे. यामध्ये वेदनाशामक (Painkillers) आणि प्रतिजैवकांसह (Antibiotics) इतर औषधांचा समावेश आहे. 800 औषधांच्या दरवाढीने गरिब आणि सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढेल. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकानुसार (WPI) दरवाढीला सरकारकडून अनुकूल मंजुरी मिळू शकते. कच्चा मालाच्या किंमती वाढल्याने, महागाईमुळे फार्मा इंडस्ट्री, औषधांच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी करत होती.
किती वाढतील किंमती?
वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकानुसार (WPI) केंद्र सरकार .0055% पर्यंत दरवाढीला मंजुरी देण्यास अनुकूल आहे. अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी (NLEM) अंतर्गत, औषधांच्या किंमतीत गेल्यावर्षी आणि 2022 मध्ये अनुक्रमे रेकॉर्ड ब्रेक 12% आणि 10% दरवाढ झालेली आहे. त्यामुळे ही वृद्धी त्यामानाने नगण्यच असेल. पण एकूणच तीन वर्षात एखाद्या औषधासाठी ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालण्यात आला हे नाकारुन कसं चालेल?
800 हून अधिक औषधं महाग
सरकारच्या या निर्णयामुळे अनेक अत्यावश्यक औषधांच्या (medicine) किंमती महागल्या आहेत. आता या ताज्या वृद्धीनंतर अत्यावश्यक औषधांसाठी ग्राहकांना खिसा खाली करावा लागणार आहे. समायोजित किंमतीमध्ये अत्यावश्यक औषधांची जी राष्ट्रीय यादी तयार करण्यात आलेली आहे, त्यात 800 हून अधिक औषधांचा समावेश आहे. नियमानुसार, वर्षातून एकदा नियोजीत औषधांच्या किंमतीत बदल करण्याची परवानगी आहे.
काय आहे अत्यावश्यक औषधं
अत्यावश्यक औषधांच्या यादीत, त्या औषधांचा समावेश आहे, ज्याचा सर्वसामान्यपणे अधिक वापर होतो. या औषधांच्या किंमती सरकारच्या नियंत्रणात असतात. या औषधांच्या किंमती कंपनी एका वर्षात केवळ 10 टक्क्यांपर्यंत वाढ करु शकते. तर सरकारच्या परवानगीने त्यात वृद्धी होते. या औषधांमध्ये कॅन्सरसंबंधी काही औषधांचा पण समावेश आहे.
या औषधांचा वाढेल भाव
अत्यावश्यक औषधांच्या यादीत पॅरासिटामॉल सारखी औषधे, ॲझिथ्रोमायसिन अँटीबायोटिक्स, ॲनिमिया औषधे, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश आहे. कोविड-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी वापरात येणाऱ्या औषधांचा, स्टेरॉईडचा पण या यादीत समावेश आहे. या औषधांच्या किंमतीत काही वाढ करण्याची मागणी फार्मा इंडस्ट्रीकडून करण्यात येत होती.