मिरजमधून चिंता वाढवणारी बातमी

राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये करोनाचा संसर्ग वाढतच असून मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात आणखी २३ डॉक्टर विद्यार्थिनींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळं
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल ३१ विद्यार्थिनींना करोना संसर्गाची (Corona Cases in Miraj) लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले असून, सर्व विद्यार्थिनींच्या विविध प्रकारच्या टेस्ट घेण्यात येत आहेत. विद्यार्थिनींमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसत असली तरी, ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन सजग झाले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी करोनाबाधित आढळल्यामुळे विद्यार्थिनींचे वस्तिगृह प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थिनींची करोना चाचणी सोमवारी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थिनींची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये २३ विद्यार्थिनींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधित विद्यार्थिनींची संख्या ३१ वर गेली आहे. या विद्यार्थिनींमध्ये लक्षणे अतिशय सौम्य प्रकारची आहेत. या सर्व विद्यार्थिनी कोणाच्या संपर्कात व कुठे गेल्या होत्या याचे कॉन्टॅक्ट ट्रेेसिंग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी करोना बाधित आढळल्याने पूर्ण लेडिज हॉस्टेल प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *