‘महाराष्ट्र अभी बाकी है’ असं म्हणणाऱ्यांना शरद पवारांचं कडक उत्तर

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये सरशी झाल्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी महाविकास आघाडीवर नव्या जोमाने हल्लाबोल सुरू केला आहे. ‘यूपी तो झाँकी है… महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा भाजपचे नेते, कार्यकर्ते देऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
पाच राज्यांतील निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पवारांनी उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यातील निकालाबाबतच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचबरोबर या निकालानंतर भाजपच्या गोटातून महाराष्ट्राबद्दल येणाऱ्या प्रतिक्रियांचाही त्यांनी समाचार घेतला. निकाल भाजपच्या बाजूनं लागताच विधानभवनात भाजपच्या काही आमदारांनी आज यूपी तो झाँकी है, महाराष्ट्र बाकी है… अशा घोषणा दिल्या. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्र बाकी आहे असं म्हणत असाल तर महाराष्ट्र तयार आहे,’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. ‘यूपी किंवा इतर राज्यांतील निकालामुळं महाराष्ट्रात कुठलाही मोठा बदल होणार नाही. मोठ्या बदलासाठी भाजपला आणखी काही वर्षे थांबावं लागेल, असं पवार म्हणाले. ‘हा निकाल लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील पक्ष अधिक जबाबदारीनं कष्ट घेतील, असंही त्यांनी सांगितलं.विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळं राज्यात ईडी आणि सीबीआयच्या धाडी वाढतील असं वाटतं का, असंही पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, ‘तो कार्यक्रम सुरूच आहे. त्याला तोंड द्यावं लागणार आहे. पण हे सरकार सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘आम आदमी पक्षानं दिल्लीत केलेल्या कामाचं फळ त्यांना पंजाबमध्ये मिळालं आहे. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि शेतकऱ्यांचा भाजपवर असलेला राग याचाही ‘आप’ला फायदा झाला, असं पवार म्हणाले. कुठलाही जनाधार नसताना एखाद्या पक्षानं दुसऱ्या राज्यात जाऊन सर्व जागा लढवणं हे तितकं सोपं नसतं हे तृणमूल काँग्रेसच्या पराभवातून दिसून आलं, असं पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *