बदाम अक्रोड केक

  • साहित्य
    २५० ग्रॅम बदामाचे पीठ (मैदा किंवा कदाचित कणिकही वापरू शकता).
    १ टीस्पून बेकिंग पावडर
    १०० ग्रॅम अक्रोडांचे तुकडे.
    १२५ ग्रॅम बटर (मुळ कृतीत २५० ग्रॅम दिलं आहे पण बदामाचं पीठ असल्याने मी अर्धच बटर घातलं).
    २०० ग्रॅम साखर (ही पण मी मुळ कृतीपेक्षा कमी वापरली)
    ४ अंडी

    कॅरॅमलाईज्ड अक्रोडांसाठी:
    १०० ग्रॅम साखर
    १०-१५ अख्खे अक्रोड (walnut halves)

    बटरक्रीमसाठी:
    १०० ग्रॅम बटर
    १/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
    २ टेबलस्पून दुध
    १०० ग्रॅम साखर

  • कृती:
    १. ओव्हन ३२० डिफॅला प्रिहीट करून घेतला.
    २. बदामाचं पीठ, बेकींग पावडर आणि अक्रोडाचे तुकडे एकत्र करून घेतले. मेरी बेरीच्या मते अक्रोडाचे तुकडे जर खूप मोठे असतील तर केक सेट करायला ठेवल्यावर ते एकदम तळात जातात. जर खूप बारिक केले तर पावडरसारखेच वाटतात. त्यामुळे ह्या दोन्हीच्या मधल्या आकाराचे असावेत. केक खाताना ते दाताखाली वेगळे कळले पाहीजेत.
    ३. दुसर्‍या भांड्यात बटर आणि साखर एकत्र फेटून घेतली. बटर आधी थोडं पातळ करून घेतलं. नंतर ह्या मिश्रणात एक एक अंड फोडून फेटून घेतलं. सगळी अंडी एकदम घालायची नाहीत म्हणे.
    ४. वरची दोन्ही मिश्रणं एकत्र करून घेतली एकत्र करताना “फोल्ड” करायची.
    ५. सगळं मिश्रणा केकच्या भांड्यात बटरचा हात लाऊन साधारण पाऊण तास बेक करून घेतलं. हवे असतील तर वरून बदामाचे काप लाऊ शकता. मूळ कृतीत केक गोल भांड्यांमध्ये केले होते पण मी लोफ पॅनमध्ये केला.
    ६. केक बेक होत असताना एकीकडे एका भांड्यात साखर अतिमंद आचेवर तापवून त्याचं कॅरॅमल केलं आणि त्यात अक्रोड घोळवून कॅरॅमलाईज्ड अक्रोड बनवून घेतले.
    ७. क्रिम करता, बटर, व्हॅनिला इसेन्स, दुध आणि साखर आधी अर्ध आणि मग उरलेलं अर्ध असं फेटून घेतलं. जर कमी फेटलं तर नंतर घट्ट होऊन वेगळं होतं. तसं झालं तर अजून फेटून घ्यायचं.
    ८. केक कापून त्याचे पातळ तुकडे केले (ब्रेडच्या पद्धतीने) आणि दोन दोन तुकड्यांच्या मध्ये बटर क्रिम लाऊन त्यांचं सँडविच केलं. ह्या बटर क्रिममध्ये साखर असल्याने मूळ केकमध्ये कमी साखर चालली. अजून कमी घातली असती तरी चाललं असतं.
    ९. वरून कॅरॅमलाज्ड अक्रोड लावले. ते दिसायला फार छान दिसत नाहीत पण लागतात छान. अक्रोडाची चिक्की खाल्ल्यासारखं वाटतं. रियाने तिच्या एका तुकडयाला थोडसं आयसिंग लाऊन घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *