शाळकरी मुलींचा रुद्रावतार; रोडरोमियोला दिला बेदम चोप
छेड काढणार्या रोडरोमिओला विद्यार्थ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. शाळेत तक्रार करूनही उपयोग न झाल्याने विद्यार्थ्यांनी थेट पालकांना सोबत घेत रोडरोमिओला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात ही घटना घडली आहे. बोदवड तालुक्यातील येवती येथील विद्यार्थिनी बस बंद असल्याने रोज जामठी येथे दोन किलोमीटर पायी शाळेत चालत जातात. या दरम्यान बेटावद खु. येथील मुलगा बापू दुमाले हा मुलींना रोज त्रास द्यायचा. विद्यार्थिनींनी शाळेत तक्रार दिली, पण तो मुलगा शाळेतील नसल्यामुळे सरांनी व मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितला.
नेहमीप्रमाणे आज सकाळी सुद्धा पावणे सातच्या सुमारास हा मुलगा मुलींजवळ येताच सर्व पालकांनी व विद्यार्थींनींनी त्याला पकडले आणि चोप दिला. शाळेत हजर करून सर्व मुलींनी सुद्धा त्याला चोप दिला आणि आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे रोडरोमियोला चांगलीच अद्दल घडली. इतर रोडरोमियांनाही जरब बसावी म्हणून या मुलाला थेट बोदवड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.