‘फडणवीसांचे घोटाळा घोटाळा ऐकून ‘त्या’ शब्दालाच काही तरी ‘घोटाळा’ झालाय असं वाटतं असेल’

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयावर भाष्य केले. सुपर मार्केटमधून वाईन विक्रीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा निर्णय लागू केला जाईल, असे पवार यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे घोटाळा घोटाळा ऐकून त्या शब्दालाच काही तरी घोटाळा झालाय, असं वाटतं असेल, असा टोला पवार यांनी यावेळी लगावला.
पवार पुढे म्हणाले की, चंद्रपुरात दारूबंदी करण्याची मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. चंद्रपुरात लहान मुले दारू विकताना आढळली होती. तसेच परराज्यातून दारू आणून विकायचे. म्हणून चंद्रपुरातील दारूबंदी उठवली, असे पवार यांनी सांगितले. दारूवरील कर आम्ही कमी केला आहे. दारूवरील कर कमी केल्याने ३०० कोटींचा कर जमा झाला. शेवटी राज्याच्या उत्पन्नाचा विचार करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले. ज्यांना दारू घ्यायची आहे, तेच सुपर मार्केटमधून दारू विकत घेण्यासाठी जातील. जे लोक घेणार नाहीत, ते कशाला सुपर मार्केटमध्ये जातील, असा सवाल करून समाजाचं नुकसान व्हावे, अशी आमची भावना नाही. महाराष्ट्रात सर्वात कमी दारूची दुकाने आहेत, असे त्यांनी सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, आम्ही विदर्भाचे विरोधक आहोत, अशी भावना तयार करण्याचे काम केले जात आहे. मराठवाडा ग्रीडला विरोध करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. टप्प्याटप्प्याने हे काम पुढे नेण्याचा आमचा विचार आहे. विकासकामांमध्ये आम्ही आडकाठी आणत नाही. ३२ वर्षे मराठवाडा आणि विदर्भाने महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. परंतु मराठवाड्याला पूर्णपणे दुर्लंक्षित केल्याचे भासवले जात आहे, असा आरोप त्यांनी नांव न घेता विरोधकांवर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *