शाळेत विद्यार्थी कोरोना बाधित, पुन्हा पालकांमध्ये भीतीचे वातावरण

एक डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र अपुरी व्यवस्था आणि शहरातील कोरोनाची (corona) स्थिती बघून काही शहरातील शाळा 15 डिसेंबर नंतर सुरू करण्यात आल्या. मात्र शाळेतील विदयार्थी कोरोना बाधित आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एका बाजूला दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्याचा आनंद ओसरत नाही तोवर दुसऱ्या बाजूला पुन्हा पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेय .

एक डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजली. मुलांना शाळेत जायला मिळणार म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला होता. शाळेत पाठयपुस्तक शिकविण्यास नुकतीच सुरुवात झालेली असताना आता मात्र नाशिकमधील नामांकित अशोका युनिव्हर्सल स्कुलमध्ये नवविचा एक विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आला आहे.

विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने सुरक्षेचे उपाय म्हणून वर्गातील सर्व 67 मुलांची rt-pcr टेस्ट आज स्थानिक चांदशी सब सेंटर द्वारे करण्यात आली. यासोबत शाळेतील नऊ शिक्षिकांची तपासणी करत ग्रामीण आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. येत्या 2 दिवसात सर्वांचे अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त होणार आहेत. तोवर शाळा बंद ठेवण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाने दिले आहेत.अहवाल प्राप्त झाल्यानंतर शाळा सुरु ठेवायची की नाही याचा निर्णय होणार आहे.

15 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मुंडेगाव आदिवासीआश्रम शाळेत 13 विद्यार्थी कोरोना (corona) बाधित आढळल्यामुळे नाशिक शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यास दहा दिवसांचा उशीर केला होता.

नाशिक शहराच्या अगदी जवळ चांदशी परिसरात ही शाळा आहे. परिणामी ग्रामीण आरोग्य यंत्रणेसह नाशिक शहरातील शिक्षण मंडळ आणि महापालिका आरोग्य विभाग त्यामुळे सतर्क झाला आहे. आता प्रत्येकाला प्रतीक्षा आहे अहवालांची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *