सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद यांना कोरोनाची लागण(Corona infection) झाली आहे. अधिवेशन काळात राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली असताना आता सुळे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सुळे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.’
सुळे या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात तसेच हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिच्या लग्नात यांनी हजेरी लावली होती. त्या अनेकांच्या संपर्कात आल्या आहेत.
नुकतेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. गायकवाड अधिवेशन काळात विधानभवानात उपस्थित होत्या. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, मला आज सकाळी कळलं की माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करत आहे.’