भारताचा द आफ्रिकेवर दणदणीत विजय
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियनमधील पहिली कसोटी टीम इंडियाने ११३ धावांनी जिंकली आहे. या सामन्यात आफ्रिकेसमोर 305 धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकन संघ केवळ १९१ धावा करू शकला आणि सामना गमावला. सेंच्युरियन येथे भारताचा हा पहिलाच कसोटी विजय आहे. या विजयासह विराटसेनेने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. द. आफ्रिकेकडून दुस-या डावात कर्णधार डीन एल्गरने सर्वाधिक ७७ धावा केल्या. तर भारताच्या मोहम्मद शमी आणि बुमराहने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विननेही प्रत्येकी दोन बळी घेतले. सेंच्युरियन येथे कसोटी सामना जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. आता या मालिकेतील पुढील सामना ३ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे सुरू होणार आहे.६६.५ व्या षटकात शमीने भारताला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने मार्को जेन्सनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विकेटच्या मागे विकेटकिपर ऋषभ पंतने त्याचा झेल पकडला. मार्कोने १४ चेंडूत १३ धावांचे योगदान दिले.सेंच्युरियन कसोटीच्या पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत आफ्रिकन संघाने दुसऱ्या डावात सात गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या. टेंबा बावुमा आणि मार्को जॉन्सन क्रीजवर आहेत. दुपारनंतर येथे पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत भारताला उपाहारानंतर लगेचच आफ्रिकन संघाला बाद करावे लागेल. लंचच्या वेळीही मैदानात पाऊस पडू शकतो आणि सामना अनिर्णित राहू शकतो.सिराजने आफ्रिकेला सहावा धक्का दिला. त्याच्या इन स्विंग झालेल्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू त्याच्या बॅटच्या आतील काठावर जाऊन स्टंपवर आदळला आणि तो बाद झाला. डी कॉकने २१ धावा केल्या. शमीने आफ्रिकेची सातवी विकेट घेतली आहे. त्याने मुल्डरला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. मुल्डर अवघी एक धाव करून तंबूत परतला. शमीने फेकलेल्या चेंडूचा मुल्डरने बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू आउट स्विंग झाला आणि मुल्डरच्या बॅटला हलकासा स्पर्श होऊन पंतच्या हाती गेला.कर्णधार एल्गर बाद झाल्यानंतर टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक हे दोघे द. आफ्रिकेचा डाव सावरण्यासाठी सरसावले आहेत. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. डी कॉक आणि बावुमा चांगल्या लयीत खेळत आहेत. ही जोडी फोडण्याचे भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
५१ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने आफ्रिकेला पाचवा धक्का दिला आहे. त्याने धोकादायक वाटत चालेल्या डीन एल्गरला एलबीडब्ल्यू आऊट केले. एल्गरने १५६ चेंडूत ७७ धावा केल्या. बुमराहचा हा चेंडू ऑफ-स्टंपवर पडल्यानंतर थेट एल्गरच्या पॅडवर आदळला आणि अंपायरने त्याला आऊट दिला. एल्गरने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि रिव्ह्यू घेतला. त्यानंतर रिप्लेमध्ये चेंडू स्टंपला लागत असल्याचे स्पष्ट दिले. त्यामुळे टीव्ही पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर एल्गरला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. यावेळी द. आफ्रिकेची धावसंख्या ५ बाद १३० होती.