दिग्गज क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा
(sports news) न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर रॉस टेलर (Ross Taylor) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बांगला देश विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विरुद्ध सहा एकदिवसीय सामने हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दितील अखेरचे सामने असणार आहेत. रॉस टेलरने (Ross Taylor) ट्विट करत निवृत्तीची घोषणा केली आहे.
”१७ वर्षांच्या अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही सन्मानाची गोष्ट आहे.” असे टेलरने ट्विटमध्ये म्हटले आहे. ३७ वर्षीय रॉस टेलरने मार्च २००६ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केल्यानंतर त्याच वर्षी त्याने आपला पहिला टी २० सामना श्रीलंका विरुद्ध खेळला. त्यानंतर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात त्याला कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.
रॉस जगातील एकमेव असा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे जो खेळाच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये १०० हून अधिक सामने खेळला आहे. न्यूझीलंडसाठी त्याने ४४५ सामन्यांत १८,०७४ धावा केल्या आहेत. त्याने ४० शतके ठोकत न्यूझीलंडला अनेकवेळा ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारत विरोधात त्याने लगावलेला विजयी चौकार त्याच्या करियरमधील महत्वाची खेळी मानली जाते. (sports news)