राज्यात कठोर निर्बंध लागू, जाणून घ्या नियमावली

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने अखेर गुरुवारी रात्री ठाकरे सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय अंत्यसंस्कारात २० तर लग्नसोहळ्यात फक्त ५० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. कोरोनाची स्थिती पाहता स्थानिक प्रशासनाला आणखी कठोर निर्बंध (restriction) लागू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

राज्यात रुग्णवाढीचा वेग खूप वाढला असून देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनग्रस्त महाराष्ट्रात आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आरोग्य खाते, टास्क फोर्स आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी दुपारी बैठक झाली नव्याने काही बंधने घालण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. अखेर गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारने कठोर निर्बंध (restriction) जाहीर केले.

आदेशात काय म्हटलंय?

राज्यात अथवा राज्याच्या कोणत्याही भागात सार्वजनिक स्थळे, पर्यटन स्थळे, गर्दीची ठिकाणी, बीच, मोकळ्या जागा, खुली मैदाने आदी ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव. संबंधित ठिकाणच्या प्रशासनाने जमावबंदीचे कलम १४४ लागू

मोकळ्या तसेच बंदिस्त जागेत पार पाडल्या जाणाऱ्या विवाह समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आणली असून, एका सोहळ्यात जास्तीत ५० जणांची उपस्थिती.

सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आदी कार्यक्रम उघड्या अथवा बंदिस्त जागी आयोजित केले असतील तर अशा ठिकाणी ५० पेक्षा जास्त जणांना उपस्थित राहता येणार नाही.

अंत्यसंस्कार अथवा त्यासंबंधीचे विधी पार पाडण्यासाठी फक्त २० जणांना उपस्थित राहता येणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंनी काय म्हटले होते?

कोरोना विशेषत: ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्यास उपचारांसह नेमके कोणते उपाय करता येतील, या अनुषंगाने गुरुवारी बैठकीत चर्चा झाली होती.

लोकांनी काळजी घेतली, त्यावरचे उपायही केले आहेत. परंतु, संसर्ग वाढीचा वेग अधिक असल्याने चाचणी, संशयितांचा शोध, रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा तयार ठेवा, अशा सूचनावजा आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

राज्यात ग्रामीण, शहरी भागांमधील सरकारी, खासगी दवाखान्यांत मनुष्यबळापासून नव्याने तयारी करावी. ज्यामुळे रुग्ण वाढले तरी प्रत्येकाला कमीत कमी वेळेत उपचार देता येतील. त्यादृष्टीने नियोजन करा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची तयारी ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणांना केले.

महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी

राज्यामध्ये गुरुवारी ५ हजार ३६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात एकट्या मुंबईमध्ये ३ हजार ६७१ रुग्ण आढळून आले असून देशभरातील ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या १००२ झाली असून त्यात महाराष्ट्रातील १९८ नव्या रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ४५० वर गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *