जितेंद्र आव्हाडांनी ओबीसींची माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या अवमानकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपाचे ओबीसी नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा इशारा नागपुरात माध्यमांशी बोलताना दिला. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे ओबीसी समाजाबद्दलचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याची टीका केली.
याआधी ओबीसींवरती माझा फार विश्वास नाही. मंडल आयोगाचे आरक्षण ओबीसींसाठी असतानाही लढायची वेळ आली, तेव्हा ओबीसी मैदानात उतरले नाहीत. कारण ओबीसींना आपल्या हक्कासाठी लढायचे नव्हते. कारण त्यांच्यावर ब्राम्हण्यवादाचा पगडा बसला आहे. त्यामुळे त्यांच्यातही श्रेष्ठत्वाची भावना रूजल्याचे व्यक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.यानंतर आव्हाडांसारख्या जातीयवादी व्यक्तीला कॅबिनेट मंत्री म्हणून ठेवू नये. जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी बावनकुळे यांनी केली. शरद पवार या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतील का?, असा सवाल बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच ओबीसी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिले.