अंगावर रॅशेस आलेत, सावधान… असू शकतं ओमिक्रॉनचं लक्षण!
राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओमिक्रॉनचं (Omicron) संकट वाढतच आहे. हे संक्रमण आणि लक्षणांबाबत अजूनही शोध सुरू आहे. ओमिक्रॉनचं रोज नव लक्षण समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात अंगावर पुरळ किंवा रॅशेस येणे उठणे हेही ओमिक्रॉनचं लक्षण असू शकतं, असा खुलासा करण्यात आला आहे.
त्वचेवरील लक्षणे
ZOE कोविड लक्षण अभ्यास अॅपनुसार, ओमिक्रॉनची लागण झालेल्या अनेक लोकांनी त्वचेवर पुरळ येण्याची तक्रार केली आहे. यात दोन प्रकारच्या त्वचा संसर्गाचा समावेश आहे. पहिल्या लक्षणात त्वचेवर अचानक पुरळ उठू लागते. त्याचबरोबर लहान मुरूमांसारखे ते दिसते. त्यावर खूप खाज सुटते. तुमच्या हात किंवा पायाला खूप खाज सुटायला लागते. तर दुसऱ्या लक्षणात घामोळे येऊन ते संपूर्ण शरीरात पसरते. त्याचा कोपर, घुडघे आणि हाता-पायाच्या त्वचेवर जास्त परिणाम होतो.
ही लक्षणेही असू शकतात
ओमिक्रॉनच्या (Omicron) इतर लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ येण्याव्यतिरिक्त, मळमळ आणि भूक न लागणे ही लक्षणेही दिसतात. सौम्य ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा अशी लक्षणेही दिसून येतात. तसेच, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, स्नायू दुखणे आणि रात्री घाम येणे ही ओमिक्रॉनची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. अशा लक्षणांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास, चाचणी करून घ्यावी.