सहा हजार ग्रामपंचायतींत स्वयंचलित हवामान केंद्रे
तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आद्र्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी राज्यातील सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यानुसार ही केंद्रे उभारण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी दिली.
राज्यात सध्या मंडळस्तरावर दोन हजार ११९ स्वयंचलित (Skymet) हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सध्या या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत पावसाची आक़डेवारी संकलित केली जाते. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने आता ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्यात येणार आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये ही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ज्या (Skymet) ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत भुसे यांच्यासह कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, स्कायमेट वेदर सव्र्हिसेसचे अधिकारी उपस्थित होते. सध्या महावेध प्रणालीमार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते.
विमा कंपन्याही ही माहिती स्कायमेट(Skymet)कडून घेतात. त्यामुळे अधिकाधिक भागांत ही केंद्रे कार्यान्वित झाली तर तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आद्र्रता, पर्जन्यमान आदींची माहिती मिळू शकणार आहे.शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि कृषीविषयक सल्ला मिळण्याबाबतही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत.
पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठीही ही केंद्रे उपयुक्त ठरणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात किमान एका मंडळातील दोन ग्रामपंचायतीमध्ये तरी ही केंद्रे उभारावीत तसेच राज्यातील प्रत्येक विभागात ती असावीत, अशा सूचना डवले यांनी स्कायमेटच्या (Skymet) अधिकाऱ्यांना दिल्या