प्रवेश नाकारला म्हणून आमदारपुत्रानं चक्क विमानतळाचं पाणीच तोडलं!

राजकीय नेतेमंडळींकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. चित्रपटांमध्ये देखील राजकीय नेत्यांची पात्र आपल्याशी वाद घालणाऱ्याला अडचणीत आणत असल्याचे प्रसंग रंगवून दाखवले जातात. पण असाच एक सिनेस्टाईल प्रकार आंध्र प्रदेशातील तिरूपती विमानतळाच्या बाबतीत घडला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांशी वाद झाल्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी एका आमदारपुत्रानं चक्क त्या विमानतळाचं आणि विमानतळ कर्मचारी राहात असलेल्या क्वार्टर्सचं पाणीच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हा आरोप संबंधित आमदारपुत्राने फेटाळून लावला असला, तरी विरोधकांनी मात्र यावरून आता वादाचं रान पेटवायला सुरुवात केली आहे.हा सगळा प्रकार घडला तो आंध्रप्रदेशमधल्या तिरूपती विमानतळावर. तिरूपतीच्या रेनिगुंटा विमानतळाचे व्यवस्थापक सुनील आणि तिरूपतीचे उपमहापौर अभिनय रेड्डी यांच्यात झालेल्या वादानंतर हे सगळं नाट्य घडून आलं. अभिनय रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आमदार करुणाकर रेड्डी यांचे पुत्र आहेत. रेड्डी हे सत्ताधारी आघाडीतील युवाजन श्रमिक रयथू काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *