भारताचे स्वप्न अधुरेच..!
दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे 30 वर्षांपासूनचे स्वप्न याही वेळेस अपुरे राहिले. दुसर्या कसोटीत विराट कोहली जायबंदी झाला. अन् त्याच्या अनुपस्थितीचा डाव साधून दक्षिण आफ्रिकेने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. तिसर्या कसोटीत विराटने दमदार पुनरागमन झाले. परंतु, अन्य सहकार्यांनी निराशा केली.(IND vs SA)
दक्षिण आफ्रिकेने 212 धावांचे माफक लक्ष्य पार करून 7 विकेटस्नी विजय मिळवत मालिका 2-1 अशी खिशात घातली. कीगन पीटरसन हा आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. आफ्रिकेने 0-1 अशा पिछाडीवरून ही मालिका जिंकली.
पहिल्या डावात दोन्ही संघांची जवळपास बरोबरी झाली होती. त्यामुळे दुसर्या डावात मोठी धावसंख्या उभारून यजमान संघाला दबावात आणण्याची भारताला संधी होती; पण विराट आणि ऋषभ वगळता कोणीही दक्षिण आफ्रिकन मार्यापुढे उभे राहू शकला नाही. विशेषत: ऋषभ पंतच्या नाबाद शतकाने आघाडी दोनशेपार गेली.