जयसिंगपुरातील तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द
(local news) येथील जयसिंगपूर विकास सोसायटीच्या रेशन धान्य दुकान क्रमांक 2, 3 व 5 या तीन दुकानांत बेकायदेशीर धान्य बाहेर नेऊन काळा बाजार सुरू असल्याचा प्रकार कोल्हापूर येथील परिवर्तन संघटनेच्या पदाधिकार्यांनी उघड पाडला होता. या दुकानांवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. अखेर मंगळवारी या तिन्ही रेशन धान्य दुकानांची अनामत रक्कम जप्त करून परवाने रद्द केल्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील जयसिंगपूर विकास सोसायटीच्या रेशन धान्य दुकान क्रमांक 2, 3, 5 या तीन दुकानांतून बोलेरो टेम्पोतून रेशन धान्याची पोती बाहेर विकण्यासाठी जात असताना त्याचे व्हिडीओ चित्रीकरण कोल्हापूर येथील परिवर्तन संघटनेने केले होते. याबाबतचे सगळे पुरावे तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे देऊन तातडीने दुकानांची तपासणी करण्याची मागणी परिर्वतन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली होती. या तपासात गहू 29.79 क्विंटल व तांदूळ 41.11 क्विंटल इतका साठा अतिरिक्त सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने टेम्पोचालक व सेल्समन जितेंद्र गुप्ता यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. (local news)
या सर्व कारभाराचा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे सादर केला होता. शिवाय हे धान्य जांभळी येथील आटा चक्की कंपनीत गेले केसे यासह विविध गोष्टी पुढे आल्या होत्या. या दुकानांचे परवाने रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी मंगळवारी तिन्ही रेशन धान्य दुकानांची अनामत रक्कम जप्त करून परवाने रद्द केले.