भारताला पहिला धक्का; शिखर धवन बाद
भारत-दक्षिण आफ्रिका संघातील दुसरा एकदिवसीय सामना आज शुक्रवारी बोलंड पार्क, पर्ल (Boland Park at Paarl) येथे सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. के एल राहुल आणि शिखर धवन सलामीला खेळत आहेत. दोघांनी चांगली सुरुवात केली आहे. के एल राहुलने १ आणि शिखर धवनने तीन चौकार ठोकत पहिल्या ४ षटकांत २६ धावा केल्या आहेत. पाचव्या षटकांत जे मलाननं के एल राहुलचा झेल सोडला. यामुळे त्याला जीवदान मिळाले.मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय फलंदाजांना या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यात कर्णधार के. एल. राहुल याच्या नेतृत्वाचीदेखील पारख होईल. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात राहुल अयशस्वी झाला होता. भारतीय फलंदाजांनी पहिल्या लढतीत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.जेव्हा विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता तेव्हापासून मध्यक्रमाची कामगिरी चिंतेचा विषय होता. दुसर्या लढतीत भारताला विजय मिळवायचा झाल्यास मध्यक्रमाला चांगली कामगिरी केल्याशिवाय पर्याय नाही. श्रेयस अय्यरला शॉर्ट पिच गोलंदाजी विरुद्ध चांगला खेळ करावा लागेल. ऋषभ पंतकडूनदेखील संघाला अपेक्षा आहेत.