विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रसारामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, येत्या सोमवारी (ता.२४) पहिली ते बारावीचे वर्ग (School Reopening) सुरु होणार आहेत. यादरम्यान शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोविड विषयक नियमांचे पालन करुन पून्हा सुरु करण्यात येणार आहेत. विभागाला याबाबत आदेश देण्यात आल्याचे माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहेकोविडचा संसर्ग अचानक वाढल्याने शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला होता. शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, कोविडची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत आहे, असे मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोविड विषयक नियमांचे पालन करुन पून्हा सुरु करण्याबाबत विभागाला आदेशित करण्यात आले आहे. वसतिगृहे सुरू करताना त्या-त्या जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्राधिकरणाच्या निर्देश व समन्वयाने आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करावीत, असे निर्देश दिले आहेत.