अयोध्येत रेल्वे अपघाताचा कट उधळला
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Eelections 2022) अयोध्येत एक मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. अयोध्येतील एका रेल्वे पुलावर स्लीपर आणि ट्रॅकला जोडणारे नट आणि बोल्ट गायब झाल्याचं आढळून आलं आहे. हा रेल्वे पूल रानोपाली रेल्वे क्रॉसिंग आणि बडी बुवा रेल्वे क्रॉसिंग दरम्यानच्या जल्पा या नाल्यावर बांधण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आधी एक मोठा रेल्वे अपघात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट असू शकतो अशी शंका सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त केली जातेय. याप्रकरणी रेल्वेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
लखनऊचे डीआरएमही त्याची चौकशी करत आहेत. याबाबत रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणी डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर (DRM) स्तरावर तपास सुरू करण्यात आला असून, रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे नटबोल्ट खोडकर लोकांनी काढलेत की हा दहशतवादी कट होता याबद्दल चौकशी केली जातेय. दुसरीक 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने घेणार असल्याचं देखील समजतंय.दरम्यान, या प्रकरणी आरपीएफ आणि अभियंत्यांच्या संयुक्त पथकाने आपला अहवाल DRM कार्यालयात सादर केला आहे. नट बोल्ट गायब झाल्याची माहिती खुद्द आरपीएफनेच अयोध्या कोतवाली पोलिसांना दिली होती. त्यावेळी, संयुक्त टीमने अहवालात काळजीपूर्वक लक्ष घालण्याचा सल्ला दिला आहे.