Corona निर्बंधासंदर्भात केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय
कोरोनाची सध्याची (current wave of corona) लाट बघता केंद्र सरकारने निर्बंध (restriction) 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून महामारीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यास सांगितले आहे. त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 (Covid 19) संदर्भात आवश्यक सर्व खबरदारी पाळण्यास सांगितले आहे.
अजूनही परिस्थिती ठिक नाही
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 407 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अजूनही 10 टक्क्यांहून अधिक आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, कोरोनाची सक्रिय प्रकरणे 22 लाखांहून अधिक आहेत. बहुतेक रूग्ण वेगाने बरे होत आहेत आणि रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे पण तरीही ही चिंतेची बाब आहे.
28 फेब्रुवारीपर्यंत निर्बंधात वाढ
एवढंच नाही तर 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 407 जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर 10 टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत सध्याचे निर्बंध (restriction) 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवताना भल्ला यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा सध्याचा ट्रेंड पाहता सावधगिरी बाळगण्याची आणि दक्षता घेण्याची गरज आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व खबरदारीचे पालन केले पाहिजे आणि त्यांची सुरक्षा धोक्यात येऊ देऊ नये.
प्रतिबंधात्मक उपाय करा
अजय भल्ला म्हणाले की, 12 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मानक आराखड्याच्या आधारे आणि परिस्थितीचे मूल्यांकन, स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाने त्वरित आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सुरू ठेवावे. इतकेच नाही तर स्थानिक पातळीवर सकारात्मकता दर आणि हॉस्पिटलायझेशनची स्थिती लक्षात घेऊन स्थानिक निर्बंध लागू करण्याचा आणि हटवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
कोविड-19 प्रोटोकॉलवर भर
गृह सचिवांनी यावर भर दिला की चाचणी, ट्रॅक, उपचार आणि लस या पाच पटीची रणनीती आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन करणे यावर सतत लक्ष केंद्रित केले पाहिजे. भल्ला म्हणाले की, राज्य अंमलबजावणी यंत्रणेने सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि मेळाव्यात फेस मास्क घालणे आणि शारीरिक अंतर राखणे यासारख्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.