राज्याला मोठा दिलासा

करोनासंसर्गाचा फैलाव (corona cases) आणि राज्यातील मृत्युदरामध्ये घट झाल्याने करोनाचिंतेमुळे अस्वस्थ झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षातील सप्टेंबर महिन्याशी तुलना करता यंदा जानेवारी महिन्यामध्ये मृत्यूदरामध्ये घट झाली असून हे प्रमाण सर्वांत कमी आहे.

ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा फैलाव वेगाने होत असला, तरीही लक्षणांची तीव्रता सहआजार नसलेल्या रुग्णांना जाणवली नाही. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मात्र मृत्यू अधिक संख्येने झाले. सप्टेंबर महिन्यात डेल्टा स्वरूपाच्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याने राज्यात १,७१८ मृत्यूंची नोंद झाली होती. या वेळी मृत्यूदर १.६२ टक्के इतका होता. ऑक्टोबर महिन्यात १,१२० मृत्यू, तर मृत्यूदर १.७९ टक्के नोंदवण्यात आला होता. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांमध्ये अनुक्रमे १.८०, ०.५३, ०.१० टक्के मृत्यूदराची राज्यात नोंद झाली.

नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात रुग्णसंख्येमध्येही घट दिसून आली. नोव्हेंबरमध्ये ४७४, तर डिसेंबर महिन्यात २३३ रुग्णांची नोंद झाली होती. जानेवारी महिन्यात रुग्णसंख्येत (corona cases) वाढ झाली असतानाही राज्यात करोनामुळे प्राण गमावलेल्यांची संख्या कमी असल्याचे दिसते. जानेवारी महिन्यात मृत्यूदर ०.१० टक्के इतका होता. राज्याच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटीपेक्षा दहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी अधिक असल्याचे दिसून येते. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर १७.२६ टक्के असून गडचिरोली, नागपूर येथे हा दर ४० टक्क्यांपेक्षा अधिक असून, मुंबई व ठाण्यात हा दर कमी झाला असून तो ७.६१ व ७.२२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

सद्यस्थिती

रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण : सक्रिय रुग्णांच्या ७.१५ टक्के

सौम्य वा लक्षणविरहित रुग्ण : सक्रिय रुग्णसंख्येच्या ९२.८५ टक्के

गंभीर रुग्ण : सक्रिय रुग्णांच्या २.२८ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *