नितेश राणेंना पुन्हा पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी मिळणार ?

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्‍लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजपचे आ. नितेश राणे यांना आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आज झालेल्या सुनावणीमध्ये १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना या प्रकरणात दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले. स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे ते सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आणखी तीन संशयित आरोपी अटक व्हायचे आहेत. त्यामुळे न्यायालय त्यांची पुन्हा पोलीस कोठडी वाढवणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, दिवाणी न्यायालयाच्या परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
आ. नितेश राणे यांची गुरुवारी सकाळी 10.30 पासून दुपारी 3.30 पर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात या गुन्ह्याचे चौकशी अधिकारी तथा कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी त्यांच्या दालनात तब्बल पाच तास कसून चौकशी केली. पोलिस तपासात पुढे आलेल्या बाबींच्या अनुषंगाने ही चौकशी झाली. त्यानंतर सायंकाळी त्यांना गोव्यात तपासासाठी नेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे यामागे
गोवा कनेक्शन आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर पोलिस कोठडीत असलेले आ. नितेश राणे यांचे स्वीयसहाय्यक राकेश परब यांचीही पोलिस ठाण्यात गुरुवारी स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली.

बुधवारी आ. नितेश राणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुपारी कणकवली न्यायालयासमोर शरण गेले होते. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्‍तिवाद ऐकून घेवून त्यांना दोन दिवसांची म्हणजे 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कणकवली पोलिस ठाण्यात सायंकाळी नेले होते. तेथून काही वेळाने त्यांना रात्री सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीत नेण्यात आले. तर गुरुवारी सकाळी त्यांना चौकशीसाठी कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *