केएल राहुलचे पुनरागमन होताच ‘या’ खेळाडूचा होणार पत्ता कट!
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचे लक्ष्य असेल. साहजिकच यासाठी टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागणार आहे. आता केएल राहुल आणि मयंक अग्रवाल संघात परतले आहेत, तसेच कोविडमधून बरे झाल्यानंतर नवदीप सैनीही संघात सामील झाला आहे आणि त्याने सरावही केला आहे.
दुसऱ्या वनडेसाठी (IND vs WI) भारतीय संघात फारसे बदल होण्याची शक्यता नाही, पण केएल राहुलच्या पुनरागमनानंतर इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावे लागेल. इशान विंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहितसह सलामीला आला. त्याने 36 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. आता त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये ठेवलं जातं की वगळलं जातं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
इशान किशन शिवाय इतर दुस-या खेळाडूला वगळले जाण्याची शक्यता कमीच आहे. विराट कोहली, ऋषभ पंत आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांच्या उपस्थितीत भारताची मधली फळीही स्ट्राँग दिसत आहे. सुर्यकुमार आणि हुडा यांनी पहिल्या वनडेत (IND vs WI) अर्धशतकी भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला होता. फिरकीपटूंबद्दल बोलायचे झाले तर वॉशिंग्टन सुंदर आणि चहल यांनी शानदार गोलंदाजी केली. सुंदरने तीन बळी तर चहलने चार विकेट घेतल्या होत्या. वेगवान गोलंदाजांबद्दल बोलताना मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी अचूक मारा केला होता. तर शार्दुल ठाकूर तितका प्रभावी दिसला नाही, त्याच्याऐवजी दीपक चाहरला संधी मिळू शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल/इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर/दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.