RCB ची रणनिती, CSK चा खेळाडूही निशाण्यावर!
(sports news) आयपीएल 2022 चा लिलाव (IPL 2022 Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. यासाठी सगळ्या 10 टीमनी त्यांची रणनिती ठरवली आहे. लिलावामध्ये आरसीबीच्या (RCB) टीमला कर्णधारही शोधावा लागणार आहे, कारण विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपद सोडलं आहे. कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन आणि ऑलराऊंडर जेसन होल्डरवर (Jason Holder) आरसीबी मोठी बोली लावण्याची शक्यता आहे. होल्डरची कामगिरी बघता आरसीबी त्याच्यावर 12 कोटी रुपयांची बोली लावण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरसीबीने या मोसमासाठी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजला रिटेन केलं आहे.
पीटीआयशी बोलताना आरसीबीच्या सूत्रांनी सांगितलं की, ‘बेन स्टोक्स उपलब्ध नाही. हार्दिक पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस दुसऱ्या टीमसोबत आहेत. मिचेल मार्श फिटनेसमुळे संपूर्ण आयपीएल खेळेल का नाही, याबाबत साशंकता आहे. रेकॉर्ड बघितलं तर होल्डरची कामगिरी शानदार आहे, त्यामुळे आरसीबी त्याच्यावर मोठी बोली लावू शकते.’
रायुडू-परागही निशाण्यावर
आरसीबीची टीम लिलावामध्ये 57 कोटी रुपयांसह उतरणार आहे. आरसीबीला तीन खेळाडूंना विकत घेण्यात जास्त रस आहे. यामध्ये जेसन होल्डरशिवाय सीएसकेचा माजी खेळाडू अंबाती रायुडू (Ambati Rayudu), राजस्थानचा माजी ऑलराऊंडर रियान परागचा (Riyan Parag) समावेश आहे. होल्डरला 12 कोटी, रायुडूला 8 कोटी आणि रियान परागला 7 कोटी दिले तर टीमचे 27 कोटी खर्च होतात, त्यामुळे टीमकडे 28 कोटी रुपये शिल्लक राहतील, असं आरसीबीच्या सूत्राने सांगितलं. (sports news)
‘कोहली, मॅक्सवेल, सिराज, होल्डर, रायुडू आणि पराग टीमचे कोअर खेळाडू होतील. तीनपैकी दोन खेळाडू जरी मिळवण्याची अपेक्षा आहे. लिलावात काय होईल, याची भविष्यवाणी करू शकत नाही, पण होल्डरवर लिलावात मोठी बोली लागेल, कारण ऑलराऊंडरची संख्या कमी आहे. क्रिस मॉरिस चांगला क्रिकेटपटू होता, पण तो 16 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या लायक होता का? नाही. ऑलराऊंडरची संख्या कमी असल्यामुळे काही फ्रॅन्चायजी त्याच्यासाठी उतावळ्या झाल्या,’ असं आरसीबीचा सूत्र म्हणाला.
‘युवराजच्या बाबतीतही असंच होतं, जेव्हा 2015 साली दिल्लीने त्याला 15 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण त्यावेळी युवराज खराब फॉर्ममध्ये होता, तरीही त्याच्यावर एवढी बोली लावण्यात आली. हा ब्रॅण्ड आणि बाजाराचा खेळ आहे,’ अशी प्रतिक्रिया सूत्राने दिली.
चेन्नई सुपर किंग्सच्या यशामध्ये अंबाती रायुडूची भूमिका महत्त्वाची ठरली. एमएस धोनीही (MS Dhoni) त्याच्याकडून खेळलेल्या खेळाडूवर जास्त विश्वास ठेवतो, त्यामुळे तोदेखील रायुडूला पुन्हा चेन्नईमध्ये घेण्यासाठी आग्रही असेल.
कोहली पुन्हा होणार कॅप्टन!
लिलावामध्ये रायुडू विकेटकीपर बॅटर म्हणून उतरत आहे. बॅटिंग, विकेट कीपिंग आणि अनुभवामुळे रायुडू प्रमुख दावेदार ठरतो. आयपीएल 2020 मध्ये चांगल्या कामगिरीनंतर रियान परागसाठी 2021 चा मोसम निराशाजनक ठरला. बॅटिंगसह रियान पराग ऑफ स्पिन बॉलिंगही करतो, त्यामुळे त्याच्यावरही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. कोहलीने कॅप्टन्सी सोडल्यामुळे आरसीबीला नवा कॅप्टनही शोधावा लागणार आहे. श्रेयस अय्यरला कॅप्टन करण्यासाठी टीम त्याच्यासाठीही आग्रही असेल. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) लिलावात विकत घेण्यात अपयश आलं तर कोहली आणखी एका मोसमासाठी कर्णधार राहावा, यासाठी आरसीबी प्रयत्न करेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.