11 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित

धुळे जिल्ह्यातील 11 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत. या दुकान चालकांकडून खुलासे मागवण्यात आले असून यानंतर अंतिम कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.

स्वस्त धान्य दुकानाचा परवाना घेतला. तथापि लाभार्थींना कोणतीही सेवा दिली नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्षानुवर्ष दुकाने अकार्यान्वित ठेवली. कोरोना कालावधीमध्ये ग्राहकांना सेवा दिली नाही. वैद्यकीय रजेचे कारण पुढे केले, म्हणून जिल्ह्यातील सुमारे अकरा स्वस्त धान्य दुकाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबित केले आहेत. त्यांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांचा खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानामध्ये शिरपूर तालुक्यातील चीलारे येथील रवींद्र सजन पावरा दुकान क्रमांक 126 , बलकुवे येथील योगेश माधवराव पाटील दुकान क्रमांक 63 , उंटावद येथील श्री शनी मंदिर ट्रस्ट दुकान क्रमांक 184 , खरदे बुद्रुक येथील नरेंद्र नारायण सोनवणे दुकान क्रमांक 193 , वाकपाडा येथील राकेश दुलबा पावरा दुकान क्रमांक 136 , साकवाद येथील राजेन्द्र नथू पाटील दुकान क्रमांक 153 , थाळनेर येथील पी झेड ठाकूर दुकान क्रमांक 105 आणि शिंदखेडा तालुक्यातील विखुरले येथील भीमगर्जना महिला बचत गट दुकान क्रमांक 105, चादगड येथील सोनाऱ्या रानमळा महिला बचत गट दुकान क्रमांक 150, वायपूर येथील रमेश महादेव भावसार दुकान क्रमांक 72 , शिराळे येथील मातोश्री महिला बचत गट, दुकान क्रमांक 180 हे सर्व दुकानदार तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता वैद्यकीय रजेवर असल्यामुळे सदर दुकानांचे प्राधिकार पत्र पुढील एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
शासनाच्या 12 नोव्हेंबर 1991 च्या निर्णयाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार जास्तीत जास्त तीन महिन्यापर्यंत वैद्यकीय रजेवर जाऊ शकतील अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी तरतूद असतानाही संबंधित स्वस्त धान्य दुकानदार हे वर्षानुवर्ष रजेवर गेल्याने त्याचा ताण इतर स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर तसेच पुरवठा यंत्रणेवर पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *