भाजपचे आठ उमेदवार निवडून येणार नाहीत : दिगंबर कामत
सत्तेचा माज डोक्यात गेला की सर्वाना आपलेच पारडे भारी असल्याचे वाटते, अशीच गत भाजपची झालेली असल्यानेच २०२२ मध्ये त्यांनी २२ हून जास्त उमेदवार विजयी होण्याची स्वप्ने बाळगली आहेत. राज्यात लोकांचा भाजपप्रती रोष तर याउलट काँग्रेसला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यास या निवडणुकीत भाजपचे आठ सुद्धा उमेदवार निवडून येणार नाहीत, असा दावा विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांनी केला. मडगाव येथे मतदान झाल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
राज्यात जागोजागी काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहिल्यास यावेळी काँग्रेसच पुढील सलग पाच वर्षासाठी स्थिर सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला. नवीन वर्षाला नवीन सरकार स्थापन होणार असून १० मार्चला विरोधकांना ‘सरप्राईज’ मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पद मिळण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणार यावर आपला विश्वास आहे, मी मुख्यमंत्री पद मिळणार म्हणून कार्य करत नसून आपल्याला लोकांच्या हितासाठी काँग्रेस पक्षाला सत्तेत आणणे आवश्यक वाटते. जे पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यात आम्ही खुश असू असेही त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या स्टिंग ऑपरेशन वरून त्यांना प्रश्न विचारले असता, स्टिंग ऑपरेशन काँग्रेससाठी फायद्याचेच ठरले असून भाजप किती खालच्या थराला जाऊ शकतात हे यावरून स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्यावेळी जनतेने कौल देऊनही काँग्रेसने सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यास वेळ केल्याची खंत अजूनही मनात असून यासाठी काँग्रेसने लोकांची माफी मागितली आहे, परिणामी लोक काँग्रेस बहुमतांनी निवडून आणतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.