निर्बंध शिथिल करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय

करोना रुग्णसंख्या घटल्याने केंद्राच्या सूचनेनुसार राज्यातील निर्बंध (restriction) लवकरच शिथिल करण्यात येणार आहेत़ त्यानुसार उपाहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आह़े

करोना रुग्णआलेख घसरल्याने निर्बंध शिथिल करण्याची सूचना केंद्र सरकारने बुधवारी राज्यांना केली होती. त्यादृष्टीने गुरुवारी सचिव पातळीवर करोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. कोणते निर्बंध शिथिल करता येतील, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी होणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर एक-दोन दिवसांत नियमावली जारी केली जाईल.

राज्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, नाटय़गृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केले आहेत. तसेच लग्नसमारंभासाठी २०० व्यक्तींना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध (restriction) रद्द करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही राज्यात ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे बंधन आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची पहिली मात्रा ९० टक्क्यांपेक्षा अधिक आणि दुसरी मात्रा ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी घेतलेल्या जिल्ह्यातच या सवलती देण्यात आल्या होत्या.

गेल्या २० दिवसांत करोना रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत असून सध्या दररोज दोन ते अडीच हजार लोक बाधित होत आहेत. त्यातही रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. त्यामुळे उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबरोबरच लग्न व अन्य समारंभांच्या उपस्थितीवरील मर्यादा वाढविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *