प्रागतिक विचारांचे छत्रपती शिवाजी महाराज

प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. प्रत्येक क्षणी सत्कर्म करत राहावे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. ते समतावादी, विज्ञानवादी होते. स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. जादूटोणा, मांत्रिक, दैवीशक्तीपेक्षा औषधोपचाराने आजार बरा होतो, हा त्यांचा विचार मध्ययुगीन काळात क्रांतिकारक होता. या सर्व बाबी त्यांच्या प्रागतिक विचारांच्या साक्षीदार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या इष्ट परंपरेचा अभिमान होता. त्यांनी आपल्या संस्कृतीचे रक्षण केले. परंतु, अनिष्ट परंपरा त्यांनी जाणीवपूर्वक नाकारल्या. ते आपल्या संस्कृतीचे अभिमानी होते. परंतु, प्रवाहपतित नव्हते. अनेक अनिष्ट रूढी, प्रथांना त्यांनी विरोध केला. ते अत्यंत प्रगल्भ विचारांचे होते. मानवी कल्याणाच्या आड येणार्‍या चुकीच्या प्रथांना त्यांनी विरोध केला. लोककल्याणकारी प्रागतिक विचारांचे त्यांनी मोठ्या हिमतीने समर्थन केले. मध्ययुगीन काळात समुद्र उल्लंघन करणे ही बाब अधर्म समजली जात होती. समुद्र उल्लंघन करणार्‍यांना प्रायश्चित्त घ्यावे लागत होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी समुद्र उल्लंघन करून कर्नाटकातील बेदनूरवर स्वारी केली. आरमार दलाची उभारणी केली. अनेक सागरी किल्ले (fort) बांधले. ‘ज्यांची समुद्रावर सत्ता, त्यांची जमिनीवर सत्ता’ हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते. ते अत्यंत दूरदृष्टीचे होते. बुद्धिप्रामाण्यवादी होते, ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते.

शिवाजी महाराजांना सोयराबाईंच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. तेव्हा पुरोहित म्हणाले, ‘मुलगा पालथा जन्मला, अपशकून आहे.’ तेव्हा शिवाजीराजे म्हणाले ‘तो दिल्लीची पातशाही पालथी घालेल.’ यावरून स्पष्ट होते की, शिवाजी महाराजांनी शकून-अपशकून, शुभ-अशुभ यावर विश्वास ठेवला नाही. त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता, अंधश्रद्धेवर नव्हता. शिवाजीराजांसाठी सर्वस्वाचा त्याग करणारे कान्होजी जेधे आजारी असताना शिवाजीराजांनी त्यांना पत्र पाठवले. त्या पत्रात शिवाजीराजे लिहितात ‘नियमित औषधोपचार घ्यावा, हयगय करू नये. विश्रांती घ्यावी.’

शिवाजीराजांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहिला नाही. प्रत्येकक्षण, प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. प्रत्येक क्षणी सत्कर्म करत राहावे, हा शिवाजीराजांचा विचार होता. त्यांनी अनेक किल्ले (fort) जिंकले. परंतु, वास्तुशास्त्र त्यांनी पाहिले नाही. शिवकाळात अत्याधुनिक साधने नसताना अशक्य कार्य त्यांनी शक्य करून दाखविले ते केवळ कर्तृत्वाच्या आणि प्रागतिक विचारांच्या बळावर!

शिवाजीराजांचे जिवलग सहकारी प्रतापराव गुजर नेसरीच्या युद्धात धारातीर्थी पडले. त्यांची कन्या जानकीबाईचा विवाह शिवरायांनी स्वत:चा पुत्र राजाराम महाराज यांच्याशी लावून दिला. त्यासाठी त्यांनी हुंडा घेतला नाही. एका सामान्य कुटुंबातील मुलीचा विवाह हुंडा न घेता स्वत:च्या पुत्राबरोबर लावून देणे, ही मध्यमुगीन काळातील क्रांतिकारक घटना आहे. कोणताही राजपरिवार न शोधता आपल्या दिवंगत सहकार्‍याच्या मुलीचे लग्न आपल्या राजपुत्राबरोबर लावणे, ही प्रेरणादायक घटना आहे. त्यांना राजपदाचा अहंकार नव्हता, बडेजाव नव्हता. त्यांची वर्चस्ववादी मानसिकता नव्हती. राजकीय प्रतिष्ठेसाठी त्यांनी आपल्या राज्यातील मावळ्यांना कमी लेखले नाही. ते समतावादी होते. त्यांनी सार्वजनिक आणि खासगी जीवनात कधीही भेदभाव बाळगला नाही.

मध्ययुगीन काळात स्त्री जीवन बंदिस्त होते. ‘चूल आणि मूल’ हा त्यांच्या जीवनाचा परिघ होता. शिवाजीराजांनी महिलांचा आदर-सन्मान तर केलाच. परंतु, त्यांना सार्वजनिक जीवनात स्वातंत्र्य दिले. आपल्या आई जिजाऊंचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. स्नुषा ताराबाई, येसुबाई यांना बालपणापासून तलवार चालविण्याचे, घोड्यावर बसण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच भविष्यकाळात त्या स्वराज्य रक्षणासाठी मोगलांविरुद्ध लढू शकल्या. शिवाजी महाराज हे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. स्त्रीदेखील हिंमतवान, कर्तृत्त्ववान, बुद्धिमान आहेे यावर त्यांचा विश्वास होता.

मध्ययुगीन काळात सती प्रथा ही अमानुष प्रथा होती. धर्माच्या नावाखाली स्त्रियांना राजरोसपणे जाळले जात होते. अशा काळात जिजाऊ माँसाहेब सती न जाता शिवाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. यावरून जिजाऊ-शिवाजीराजे हे सती प्रथेविरोधात होते, हे स्पष्ट होते. मध्ययुगीन काळात राजा होणे, राज्याभिषेक करणे या बाबी अशक्य होत्या, त्या बाबी शिवाजीराजांनी शक्य करून दाखविल्या हे केवळ प्रागतिक विचारांच्या बळावर! शिवाजीराजे समतावादी होते, ते विज्ञानवादी होते, त्यांनी महिलांना स्वातंत्र्य दिले. त्यांनी हुंडा पद्धती नाकारली. परराज्यात गेल्यावरही त्यांनी शेती, पाणी, महिला, धार्मिक स्थळे, पर्यावरण यांचा आदर केला.

लोककल्याणकारी राज्य हे शिवरायांचे धोरण होते. आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, असे धोरण ते कटाक्षाने राबवत असत. शिवकाळातदेखील दुष्काळ होता, गरिबी होती. जलसिंचन तर अत्यल्प होते. परंतु, शिवरायांचे शेतकरी धोरण हे शेतकरीप्रधान होते. म्हणून शिवकाळात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नाहीत. या सर्व बाबी त्यांच्या प्रागतिक विचारांच्या साक्षीदार आहेत. ‘जागतिक इतिहासात मध्ययुगीन कालखंड हा ‘डार्क एज’ होता. या अंधारयुगात छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आधुनिक लोकशाहीचा पाया रचला. सर्वधर्म समभाव, समता, संवेदनशीलता, मानवता, आपत्ती व्यवस्थापन यामध्ये त्यांनी आदर्श घालून दिला. अशा प्रागतिक विचारांच्या राजाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *