शिवज्‍योत आणण्यासाठी गेलेल्‍या तरूणांचा अपघात;

किल्ले रायगड येथे शिवज्योत आणण्यासाठी रात्री भोर घाट मार्गे महाडकडे येत असलेल्या दुचाकीस्वाराचे पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटून वाघजाई मंदिराच्या पुढे दुचाकी २०० फूट खोल दरीत कोसळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून खोल दरीत कोसळूनही हे तिघेही वाचले. पुढे गेलेल्या त्यांच्या साथीदारांनी मागे येऊन त्यांचा शोध घेतल्यानंतर ते दरीत कोसळल्याचे लक्षात आले. शिवज्योत आणण्यासाठी येणारे शिवभक्त स्थानिक नागरिक यांच्या मदतीने या तिघांना शर्थीचे प्रयत्न करून बेशुद्धावस्थेत दरीतून बाहेर काढले.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, भोर तालुक्यातील भांबोडे व भोगवली या गावातील सात ते आठ तरुण शिवभक्त दुचाकीवरुन काल (शुक्रवार) मध्यरात्री नंतर किल्ले रायगडावर जाण्यासाठी निघाले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या मित्रांपैकी प्रथमेश प्रविण गरुड, प्रितम संदेश देसाई (रा. भांबोडे, ता. भोर), किरण राजेंद्र सुर्यवंशी (रा. भोगवली, ता. भोर) हे वाघजाई मंदिराच्या पुढे पोचले असता, ज्या दुचाकीवरून येत होते त्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्यांची दुचाकी दरीच्या बाजुस जाऊन २०० फूट खोल दरीत कोसळली.
पुढे गेलेल्या त्यांच्या साथीदारांनी आपले तिघे सहकारी अद्याप का आले नाहीत म्हणून ते पुन्हा माघारी येऊन त्‍यांचा शोध घेतला. त्‍यावेळी गाडीच्या चाकांच्या ठशावरून ते दरीत कोसळले असल्याचे लक्षात आल्यानंतर पाठीमागून येणारे अन्य शिवभक्त तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने दरीत उतरुन जखमी अवस्थेत बेशुद्धावस्थेत असणार्‍या या तिघांना शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले.

या अपघाताची माहिती महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यास मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी रुग्णवाहिकेतून या तिघा जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी एका रुग्णावर तर अन्य दोघांवर डॉ रानडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *