जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक, दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार

जम्मू- काश्मीरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत (Shopian Encounter) दोन सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शोपियां जिल्ह्यातील जैनापुरातील चेरमार्ग भागात ही चकमक झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनापुरातील चेरमार्ग भागात (Shopian Encounter) दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा जवानांनी या परिसराची घेराबंदी करुन सर्च ऑपरेशन सुरु केले होते. याच दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षा जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी ठार झाला. अद्याप ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही.
एका वृत्तानुसार, जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या कारवाईत मारण्यात आलेला दहशतवादी परदेशी असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या विकासकामांबरोबरच या भागातील सुरक्षा स्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल शुक्रवारी आढावा घेतला होता. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज नरवणे तसेच वरिष्ठ लष्करी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सुरक्षा स्थितीवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. कलम ३७० संपुष्टात आणल्यापासून जम्मू काश्मीरवर केंद्राचे नियंत्रण आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० संपुष्टात आणले होते, त्याचवेळी जम्मू – काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *