विराट कोहली तिसऱ्या सामन्यासाठी संघाबाहेर

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात जेव्हा भारताचा डाव अडचणीत आला होता, तेव्हा विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आणि संघाला सावरले होते. विराट फॉर्मात आल्याचे म्हटले जात होते. पण आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मात्र विराट खेळणार नसल्याचे आता समोर आले आहे.
नेमकं घडलं तरी काय….
बीसीसीायने आता विराट कोहलीबबात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोहली तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. बीसीसीआयने कोहलीला बायो-बबल ब्रेक दिला आहे. गेल्या बऱ्याच कालावधीपासून विराट संघाबरोबर असल्यामुळे त्याला हा ब्रेक बीसीसीआयने दिल्याचे समजते आहे. त्यानुसार विराट तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वीच आपल्या घरी रवाना होणार आहे. त्यामुळे तो आता तिसरा ट्वेन्टी-२० सामना खेळू शकणार नाही. क्रिकबझने दिलेल्या बातमीनुसार, विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध होणारी टी-२० मालिका खेळू शकणार नाही. कोहली या मालिकेसाठी विश्रांती घेऊ शकतो, पण तो कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. विराट कोहली त्याचा १०० वा कसोटी सामना मोहालीत खेळणार आहे. जर विराट पहिल्या कसोटीत खेळला नाही, तर त्याची १०० वी कसोटी बंगळुरूमध्ये होऊ शकते. त्यामुळे आता कोहली थेट आपल्या १००व्या कसोटी सामन्यात खेळताना दिसू शकतो.
दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विराटनेच भारताला अडचणीतून बाहेर काढले होते. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना विराट कोहली संघासाठी धावून आला. विराट कोहलीने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले आणि संघाचा डाव सावरला. कोहलीने यावेळी ४१ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली. अर्धशतक झळकावल्यावर मात्र कोहलीला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही आणि पुन्हा एकदा भारतीय संघ अडचणीत सापडला. पण त्यानंतर रिषभ पंतने भारताला या अडचणीतून बाहेर काढले. पंतने २८ चेंडू सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५२ धावांची खेळी साकारली. पण विराटने यावेळी भारताच्या धावसंख्येचा पाया मजबूत रचला होता, त्यावर पंतने कळस चढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *