देशव्यापी आणीबाणी जाहीर, रशियाकडून हल्ल्याची भीती वाढली
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर युक्रेननं (Ukraine) बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली. दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली. मॉस्कोनं (Moscow) युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं.
युक्रेनच्या खासदारांनी राष्ट्रव्यापी आणीबाणी लागू करण्याच्या राष्ट्राध्यक्ष वलोदिमिर जेलेन्स्की यांच्या आदेशाला मान्यता दिली, जी आजपासून म्हणजेच गुरुवारपासून 30 दिवसांसाठी लागू राहिल.
अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यानं सांगितलं की, युक्रेनच्या सीमेजवळ तैनात असलेल्या रशियन सैन्याला हल्ल्याचा आदेश मिळाल्यास ते हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, 80 टक्के सैन्य सुसज्ज आहे आणि सीमेपासून पाच ते 50 किमीच्या परिघात तैनात आहे. रशियन सैन्यानं दोनबास (युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात) प्रवेश केला आहे की नाही याची आम्ही अद्याप पुष्टी करू शकत नसल्याचं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रातील रशियाच्या राजदूतानं जगभरातील देशांना युक्रेनच्या पूर्वेकडील फुटीरतावादी प्रदेशांमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि घृणहत्या थांबविण्यास मदत करण्याचं आवाहन केलं. युक्रेनच्या पूर्वेकडील भागात शांतता भंग करणार्यांना उदारता दाखवण्याचा कोणताही हेतू नसावा, असे संयुक्त राष्ट्रातील रशियाचे राजदूत वासिली नेबेंजिया यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितलं. ते म्हणाले की, लुहान्स्क आणि डोनेस्तक येथून हजारो लोकांचे रशियामध्ये आगमन हे दर्शवते की युक्रेन त्यांच्याशी अपमानजनक व्यवहार करत आहे.
रशियाने युक्रेनमधील आपला दूतावास रिकामा केला
रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं बुधवारी सांगितलं की, मॉस्कोनं युक्रेनमधील आपला दूतावास रिकामा केला आहे. त्याचबरोबर युक्रेननंही आपल्या नागरिकांना रशिया सोडण्याचं आवाहन केलं आहे. मॉस्कोचे (Moscow) कीवमध्ये दूतावास आणि खार्किव, ओडेसा आणि ल्विव्हमध्ये वाणिज्य दूतावास आहेत. रशियानं युक्रेनमधील आपले राजनैतिक प्रतिष्ठान रिकामे केले असल्याचे तासच्या वृत्तात म्हटलं आहे.