शेअर बाजार कोसळले, पाच लाख कोटींचा चुराडा
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी भांडवली बाजारात (market) प्रचंड घसरण झाली. गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला आणि पैसे काढून घेतले. या पडझडीत सेन्सेक्स २००० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ५८० अंकांनी कोसळला आहे. या घसरणीत जवळपास पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
बाजार सुरु होताच सर्वच क्षेत्रात विक्रीचा मारा दिसून आला. बँका, ऑटो, पीएसयू यामध्ये प्रचंड विक्री झाली आहे. रशिया युक्रेन युद्ध आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम याची चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे.
सेन्सेक्स मंचावरील सर्वच्या सर्व ३० शेअरमध्ये मोठी घसरण झाली. एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टीसीएस, या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. निफ्टी मंचावरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात २ ते ३ टक्के इतकी प्रचंड घसरण झाली आहे. यात बँकांच्या शेअरला मोठा फटका बसला आहे. अदानी पॉवर, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, टाटा मोटर्स, येस बँक, धनी सर्व्हिसेस, सेल या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८०९ अंकाच्या घसरणीसह ५५४२२ अंकावर आहे. निफ्टी ५०५ अंकांनी कोसळला असून तो १६५५८ अंकावर ट्रेड करत आहे. या पडझडीने गुंतवणूकदार मात्र चांगलेच होरपळून निघाले आहेत. आजच्या घसरणीत कंपन्यांचे बाजार (market) भांडवल जवळपास पाच लाख कोटींनी कमी झाल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे.
रशियाच्या या निर्णयानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर करण्याची घोषणा केलीय. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी VEB आणि रशियन मिलिटरी बँक या दोन वित्तीय संस्थांवर निर्बंध लादण्याची घोषणा केली. तसंच रशियन अर्थव्यवस्थेचे काही भाग आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतून काढून टाकले जात असल्याचंही बायडेन यांनी म्हटलं. यासोबतच रशियातील उच्च वर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही निर्बंध लादले जाऊ शकतात.
काल बुधवारी दिवसभरातील अस्थिर सत्रानंतर बीएसई सेन्सेक्स ६८ अंकांने घसरून ५७,२३२.०६ पातळीवर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक बुधवारी ११९ अंकांनी वाढून २३,५३६.७२ वर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप २२७ अंकांनी वाढत दिवसअखेर २६,९४६.३४ वर पोहोचला. निफ्टी५० निर्देशांक मंगळवारच्या तुलनेत ३८ अंकांनी घसरून १७,०५४.१५ वर बंद झाला. बँक निफ्टी अवघ्या ७ अंक घसरणीसह दिवसाच्या शेवटी ३७,३६४.२५ वर स्थिरावला.