महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली तर…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे म्हणतात. राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते. जर निवडणूक लागली आणि महाविकास आघाडी एकत्र आली तर भाजपच्या वाटणीला काहीच येणार नाही, असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कठोर कारवाईच्या निषेधार्थ आज शुक्रवारी शिवाजी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील ,शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारच्या कारवाईच्या विरोधात मंत्री नवाब मलिक सातत्याने पुरावे देऊन भांडाफोड करत होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तीस वर्षापूर्वींचे जमीन व्यवहाराचे प्रकरण उकरून काढत नवाब मालिकांचे दाऊदशी संबंध आहेत असे सांगून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. केंद्रात भाजपची सात वर्षे सत्ता आहे. स्वतः देवेंद्र फडवणीस पाच वर्षे राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. पण या कालावधीत नवाब मलिक यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा मुश्रीफ यांनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत सुरू आहे. देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे. करोना काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कार्याचा गौरव न्यायसंस्थेने केला आहे. असे असताना चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येणार असे म्हणत आहेत. घटना आणि कायद्यानुसार राष्ट्रपती राजवट लावण्यात महाराष्ट्रात एकही कारण नाही. राष्ट्रपती राजवट लागू केली तरी सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते. बहुमतासाठी १४५ आमदार निवडून आणावे लागतात. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र आली तर भाजपचे वाट्याला काहीच येणार नाही, असं मुश्रीफ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *