जयसिंगपूर येथे रविवारी”फिटे अंधाराचे जाळे…
मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी गीतांचा कार्यक्रम: जेष्ठ गीतकार सुधीर मोघे व ना.धो. महानोर यांच्या निवडक लोकप्रिय मराठी गीतांचा “फिटे अंधाराचे जाळे” हा कार्यक्रम रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे होणार आहे.
जेष्ठ भावगीत गायक स्व. अरुण दाते यांच्या भावगीतांच्या “शतदा प्रेम करावे” या कार्यक्रमाच्या उत्तुंग यशानंतर निर्माते अविनाश सूर्यवंशी यांनी “फिटे अंधाराचे जाळे” या नवीन कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीतील निवडक लोकप्रिय गीतांचा भावरंगी सोहळा रंगणार आहे.
अविनाश सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे निर्माते असून गायक मुकुंद चौगुले हे प्रस्तुतकर्ते आहेत. अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, नेत्रदीपक नेपथ्य,प्रकाश योजना असा वैशिष्ट्यपूर्ण हा कार्यक्रम असून मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गीतांच्या संगीतमय प्रवासाचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमास निमंत्रितांसाठी प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गायक मुकुंद चौगुले व गायिका सौ.नीता ठाकूर देसाई हे स्वरसाज चढविणार असून रिदम ऋतिक कुरणे,विश्वनाथ चौगुले,सचिन देसाई,सर्जेराव कांबळे,हर्मनी संग्राम कांबळे,व्हायोलिन केदार गुळवणी यांची सांगतसाथ असणार आहे. निवेदक साहिल शेख हे आहेत. ध्वनी व्यवस्था प्रशांत होगाडे व ऋषिकेश ठाकूर देसाई यांची आहे. प्रकाश योजना अमित ठाकूर-देसाई व नेपथ्य सुदाम साळुंखे यांचे आहे. तरी या स्वरमैफिल कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निर्माते अविनाश सूर्यवंशी यांनी केले आहे.