युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न
रशिया आणि युक्रेनमधील लढाई आता काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. एकटा पडल्याने युक्रेन लवकर शरणागती पत्करेल असे रशियाला वाटत होते. परंतू राजधानी कीवपर्यंत वेगाने धडक मारलेल्या रशियाला कीवमध्ये जोरदार प्रत्यूत्तर मिळत आहे. यातच युक्रेनने रशियाला युद्ध थांबवून चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले होते. रशियाने ते स्वीकार केले होते. मात्र, रशियाने युक्रेनवर गंभीर आरोप केला आहे. रशियाने केलेल्या दाव्यानुसार चर्चेसाठी जो प्रस्ताव दिला होता, तो युक्रेनने स्वीकारलेला नाही.
यामुळे आता युक्रेनवर यापेक्षा जोरदार हल्ले चढविले जाणार आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सैन्याला युक्रेनवरील हल्ले आणखी वेगवान आणि आक्रमक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे.
भीषण परिस्थिती, स्फोटांचे आवाज, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ असं सगळं सुरू असताना एका जोडप्याने लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण ऐकून तुम्ही देखील भावूक व्हाल. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार 21 वर्षीय यारयाना अरिएवा (Yaryna Arieva) आणि तिचा पार्टनर 24 वर्षीय प्रियकर स्वियाटोस्लाव फर्सिन (Sviatoslav Fursin ) यांनी कीवमधील सेंट मायकल मॉनेस्ट्रीमध्ये लग्न केलं. खरं तर त्यांना सहा मे रोजी लग्न करायचं होतं. डनिपर नदीवर उभारलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ते हा सोहळा अत्यंत आनंदात साजरा करणार होते.