“कोणत्याही पक्षाशी संबध जोडू नये, आम्ही कुणाचीही सुपारी घेऊन याठिकाणी बसलेलो नाही”

मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने (government) खा. संभाजीराजे यांना सोमवारी सकाळी 11 वाजता चर्चेचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या सात मागण्यांबाबत योग्य तो तोडगा काढू. त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर लवकरच चर्चा करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी सायंकाळी दिले होते. खासदार संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणस्थळी आझाद मैदानात त्यांनी भेट दिली.

त्यावेळी ते बोलत होते. यावरून राज्य सरकारने (government) मराठा समाजाच्या मागण्यांसाठी चर्चेची दारे खुली केली असल्याचे दिसते. मात्र लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली आहे. दरम्यान, समरजितसिंह घाटगे यांनीही संभाजीराजेंची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

मराठा समाजासाठी सुरू असलेले उपोषण हे पक्षविरहित आहे. याचा कोणत्याही पक्षाशी संबध जोडू नये व आम्ही कुणाचीही सुपारी घेऊन याठिकाणी बसलेलो नाही, असेही संभाजीराजे यांनी उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी स्पष्ट केले. दरम्यान, रविवारी सायंकाळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संभाजीराजे यांच्याबरोबर व्यासपीठावरच 10 ते 15 मिनिटे चर्चा केली.

त्यानंतर उपस्थितांशी बोलताना वळसे-पाटील यांनी मराठा समाजाचे प्रश्न सुटावेत ही आपलीही भूमिका आहे. त्याचवेळी संभाजीराजे यांची प्रकृतीसुद्धा आमच्याद़ृष्टीने महत्त्वाची आहे. हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर दोन दिवसांतच चर्चा करू. तेव्हा मराठा समाजबांधवांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

त्यानंतर संभाजीराजे यांनी राज्य सरकारने चर्चेसाठी आपल्याला दारे खुली केली आहेत. उद्या (दि. 28) गृहमंत्री वळसे-पाटील हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. गेल्यावर्षी कोल्हापुरात 16 जूनच्या मूक आंदोलनावेळी 15 दिवसांत हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. तेव्हा आम्ही लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही. कुणीही कायदा हातात घेऊ नये, शांततेने हे आंदोलन सुरू ठेवावे व समाजाला वेठीस धरू नये, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

मराठा समाज बांधवांसाठी संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे महाविकास आघाडीतील मंत्री, आमदारांना लक्ष द्यायला वेळ नाही. पण अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी मंत्रालयाजवळ आंदोलन करायला त्यांना वेळ आहे, अशी टीका शाहू ग्रुपचे चेअरमन व भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. संभाजीराजे यांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *