युक्रेनमध्ये अडकलेले सांगली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी सुखरूप
आपली सगळी लेकरं सुखरूप आहेत, सध्या रूमानियातील कॅपिटल विमानतळा शेजारील एका हॉटेलात एकत्रच आहोत, त्यांच्याशी रविवारी दिवसभर संपर्कच होत नव्हता. मात्र उशिरा संपर्क झाला, तोवर जीवात जीव नव्हता” ही प्रतिक्रिया आहे, युक्रेनमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थिनीच्या आईची. (ukraine russia war update )
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या धुमश्चक्रीत सांगली जिल्ह्यातील १४ विद्यार्थी अडकले आहेत. यातील एक विद्यार्थिनी परतली आहे. दुसरी एक-दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे; पण उर्वरित १२ विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. तिकडे मोबाईल आणि सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होणे मुश्कील बनले आहे. यामुळे नातेवाईकांचा धीर सुटत चालला आहे. पाल्यांच्या काळजीने अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. सरकारशी संपर्क करून त्यांना परत आणण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू आहे. अशा आशयाची बातमी काल रात्री ‘पुढारी’ च्या वेबपोर्टलवर आणि आज ‘दैनिक पुढारी’ च्या सांगली आवृत्ती मध्ये प्रसिद्ध झाली. युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी व नागरिक अत्यंत भीषण परिस्थितीतून जात आहेत.
रविवारी रात्री उशिरा या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क झाला असल्याची माहिती विट्याचे ज्येष्ठ पत्रकार रविनाना भिंगारदेवे यांनी सांगितले. रवीनाना यांची बहीण उषा मोरे (जि. लातूर) यांनी त्यांना सांगितले आहे. उषा मोरे यांचा मुलगी कुणाल आणि तिची बहीण वैष्णवी मोरे या सुद्धा युक्रेन मध्ये या १२ विद्यार्थ्यांच्या सोबतच आहेत.
काल युक्रेनमध्ये ब्लॅक आऊट केले होते. त्यामुळे लाईट नव्हती आणि मोबाईल, इंटरनेट बंद केल्याने संपर्क झाला नव्हता. मात्र रात्री उशिरा कोमल मोरेने आई उषा मोरे लातूर यांच्याशी संपर्क साधला आणि सविस्तर माहिती दिली की, “रविवारी भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना युक्रेनची सीमा ओलांडून रुमनिया देशात आणले आहे. त्यापूर्वी युक्रेन सीमेवर शीख समुदायाच्या वतीने सामुदायिक लंगर येथे आम्हाला जेवण मिळाले. सध्या आम्ही सर्व विद्यार्थी – विशाल सुभाष मोरे (दिघंची, ता. आटपाडी) आदित्य अर्जुन पुसावळे (दिघंची, ता. आटपाडी), स्नेहल नवनाथ सावंत (दिघंची, ता. आटपाडी), संध्या रामचंद्र मोरे (दिघंची, ता. आटपाडी), कोमल तानाजी लवटे (विठलापूर, ता. आटपाडी)यांच्यासह रुमानिया येथील कॅपिटल विमानतळा जवळील हॉटेलमध्ये सुखरूप आहोत”.
तसेच या भागात इमर्जन्सी सदृश परिस्थिती असल्याने “आम्हाला फोन करू नका, आम्हीच तुम्हाला वेळ बघून फोन करतो, आजची फ्लाईट रद्द झाली आहे. परंतु पुढच्या २४ ते४८ तासात आम्हाला भारतात नेणार आहेत ” असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे असेही कुणालने आपल्याला सांगितले आहे. आणि व्हिडीओही पाठवल्याची माहिती कुणालची आई उषा मोरे यांनी दिली आहे. (ukraine russia war update )