ईडीच्या कठोर कारवाईनंतर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही ईडीने दणका दिला आहे. नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची ९० एकर जमीन तर अहमदनगर येथील ४.६ एकर जमीन ईडीने जप्त ‌केली आहे. या कारवाईनंतर प्राजक्त तनपुरे हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.

‘भाजप नेत्यांच्या चौकशीसाठी संजय राऊतांना पंतप्रधान कार्यालय कशाला हवे?’
नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मशीनरी लिलावात विकत घेण्यात आली. ती शिफ्ट करत त्यातून तनपुरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी येथे प्रसाद शुगर या खासगी कारखान्याची उभारणी केली. मात्र, या व्यवहारात मोठी अनियमितता आढळून आल्याने ईडीने ही कारवाई केली असून, प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ईडी, आयटी व अन्य केंद्रीय यंत्रणांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही महिन्यांपासून अटकेत आहेत. तसंच नवाब मलिक यांच्यावरही काही दिवसांपूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली असून ते ईडी कोठडीत आहेत. त्यानंतर आता कारवाई झालेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यावर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत. लागोपाठच्या या कारवाईमुळं राष्ट्रवादीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *