भारतीय लेकरांच्या सुटकेसाठी मोदी सरकारकडून हवाई दलास पाचारण
युक्रेनमध्ये सलग सहाव्या दिवशी रशियाकडून लष्करी कारवाई सुरुच आहे. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी ऑपरेशन गंगा सुरु करण्यात आले, असले तरी अजूनही हजारो युक्रेनसह विविध सीमांवर अडकले आहेत.
रोमानियाच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना येण्यास सांगूनही अनेक जणांना मायदेशी परतता आलेलं नाही. कोसळत असलेल्या बर्फाखाली ते जीव मुठीत घेऊन मायभूमीत परतण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे ऑपरेशन गंगाला अधिक वेग देण्यासाठी भारतीय हवाई दलाला पाचारण करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
आयएएफ युक्रेनला मानवतावादी मदत अधिक कार्यक्षमतेने वितरीत करण्यात मदत करेल, जे रशियन सैन्याने रोखल्याने अन्न, इंधन, वैद्यकीय पुरवठा आणि इतर आवश्यक गोष्टींचा तुटवडा आहे. सहा दिवसांपूर्वी रशियाने हल्ला केलेल्या युक्रेनमधील भारतीय नागरिकांना, बहुतेक विद्यार्थी, यांची सुटका करण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. आतापर्यंत, सहा फ्लाइट्समधून 1,396 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून परत आणण्यात आले आहे.
कदाचित याबाबत यापूर्वीच निर्णय झाला असता, तर परिस्थिती वेगळी दिसली असती, पण आक्रोश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल होताच सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. हवाई दलाला पाचारण करण्यामागे कमी वेळात अधिकाधिक विद्यार्थ्यांची सूटका व्हावी हा उद्देश आहे. भारतीय हवाई दलाकडून C-17 aircraft तैनात होण्याची शक्यता आहे.स्पाईस जेटकडून व्हाया स्लोव्हाकिया विमान पाठवून देणार असल्याची माहिती केंद्रीय कायदे मंत्री किरण रिजीजू यांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या सूटकेसाठी जी मोहीम राबवण्यात येत आहे त्याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना माहिती दिली आहे.