भारतीयांसाठी PM मोदींचा मोठा निर्णय, राष्ट्रपतींनाही भेटले

युक्रेनमधील परिस्थिती ( russia ukraine war ) दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून सुरू असलेल्या बचाव मोहीमेत भारतीय हवाई दलाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत ( India Evacuation Ukraine ) आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाला या मोहिमेत सहभागी होण्याचे आदेश दिल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( PM Modi meets President Ram Nath Kovind ) यांची भेट घेतली. या भेटीत युक्रेन संकटासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना माहिती दिली, असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले.
भारतीय हवाई दल युक्रेनमध्ये अकडलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मंगळवारपासून अनेक सी-17 विमाने तैनात करू शकते. नागरिकांना बाहेर काढण्याबरोबरच हवाई दल मानवतावादी मदत अधिक कार्यक्षमतेने पोहोचविण्यात मदत करेल, असे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत फक्त खासगी भारतीय विमानांद्व्रारे रोमानिया आणि हंगेरीमधून भारतीयांना बाहेर काढण्यात येत होते. कारण युक्रेनचे हवाई क्षेत्र २४ फेब्रुवारीपासून बंद आहे. युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर भारताने २६ फेब्रुवारीपासून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना युक्रेनच्या शेजारील देशांच्या सीमेवर आणून त्यांना मायदेशात सुरक्षित पोहोचवलं जात आहे. युक्रेनमधून सुमारे १४ हजार नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम भारताने सुरू केली.
.याआधी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने चार केंद्रीय मंत्र्यांना युद्धग्रस्त युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सोमवारी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग आणि किरेन रिजिजू यांना युक्रेनच्या शेजारील देश हंगेरी, रोमानिया-मोल्दोव्हा, पोलंड आणि स्लोव्हाकिया येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने मोठी माहिती दिली आहे. गेल्या १५ दिवसांत आतापर्यंत ८००० भारतीय युक्रेनमधून परतले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी चार मंत्र्यांशी वैयक्तिकरित्या बोलून त्यांना या निर्णयाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू आणि व्ही. के. सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांना भेट देणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. शिंदे हे भारतीयांना युक्रेनमध्ये हलवण्याच्या ऑपरेशनसाठी रोमानिया आणि मोल्दोव्हासोबत समन्वयाचे काम हाताळतील. तर रिजिजू स्लोव्हाकियाला जाणार आहेत. पुरी हंगेरीला जाणार असून सिंग पोलंडला जाऊन भारतीयांना बाहेर काढण्याची व्यवस्था करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
युक्रेनमधून दिल्लीत विमानाने परतलेल्या भारतीयांचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी स्वागत केले. मांडवीय यांनी दिल्ली विमानतळावर जाऊन विमानाने सुरक्षित परतलेल्या भारतीयांचे विमान जाऊन स्वागत केले. युक्रेनमध्ये अजूनही अनेक भारतीय मित्र अडकले आहेत. त्यांना मायदेशात आणण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर आणि सातत्याने सुरू आहे, असे मांडवीय म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *